क्रिकेटपटूंनी मानसिकदृष्टय़ा कणखर राहण्याबरोबरच दुखापतींपासूनही दूर राहण्याची गरज आहे. त्यामुळेच करोनानंतर क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर क्रिके टपटूंना जोमाने पुनरागमन करता येईल, असा सल्ला भारताचे माजी फलंदाज संदीप पाटील यांनी दिला आहे. करोनामुळे तीन महिने क्रिकेट पूर्णपणे ठप्प असून ८ जुलैपासून इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेने या खेळाची सुरुवात अपेक्षित आहे.

भारताच्या क्रिकेट संघासाठी इतक्यात कोणतीही क्रिकेट मालिका प्रस्तावित नाही. या स्थितीत भारतीय खेळाडूंसाठी पुनरागमन हे शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा आव्हानात्मक असेल, असे संदीप पाटील यांना वाटते. ‘‘कोणत्याही खेळाडूसाठी पुनरागमन हे दुखापतींना निमंत्रण देणारे असू शकते. या स्थितीत दुखापतींना दूर ठेवण्याचे आव्हान क्रिकेटपटूंसमोर आहे. दुखापतींना दूर ठेवताना मनानेही तितकेच खंबीर राहावे लागेल. कोणत्याही स्पर्धेत पुनरागमन करताना खेळाडूंची मनाची खंबीरता मोठी असावी लागते. ज्या वेळेस मी केनियाचा प्रशिक्षक होतो तेव्हा खेळाडूंना कोणत्याही मालिकेआधी मनाने खंबीर होण्याचा सल्ला द्यायचो,’’ असे १९८३च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य संदीप पाटील यांनी सांगितले.

पाटील यांनी खेळाडूंच्या मानसिक सामर्थ्यांचे महत्त्व सांगताना १९८३च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लढतीचे उदाहरण दिले आहे. ‘‘१९८३च्या विश्वचषकाच्या अंतिम लढतीत भारताला १८३ धावांमध्ये रोखण्यात आले होते. आम्ही पराभूत होऊ, असेच त्या वेळेस वाटत होते. मात्र त्याच वेळेस सांघिक भावना जागृत झाली आणि मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी उतरण्यापूर्वी जिंकायचेच, हा निश्चय आम्ही संघातील प्रत्येकाने केला. त्यानंतर जे घडले तो इतिहास सर्वानाच माहिती आहे,’’ असे ६३ वर्षीय पाटील यांनी सांगितले.

वेस्ट इंडिजच्या १९८३च्या संघातील फलंदाजांना गोलंदाजी करणे सोपे नव्हते, अशी आठवणही त्यांनी सांगितली. ‘‘गॉर्डन ग्रिनीज, व्हिव रिचर्ड्ससारखे फलंदाज विंडीजच्या संघात होते. मात्र त्या वेळेस विश्वचषकावर आमचेच हात आहेत, असे चित्र आम्ही डोळ्यासमोर ठेवले होते. फक्त क्रिकेटपटूच नाही तर कोणत्याही खेळाडूसाठी मानसिकदृष्टय़ा खंबीर असणे महत्त्वाचे असते, तरच त्याचा निभाव लागतो,’’ असे पाटील यांनी सांगितले.