इंग्लंडचे ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांची भारतीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या भारताच्या २३ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक म्हणून काम करीत आहेत.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने तीन वर्षांकरिता ही नियुक्ती केली आहे. पुढील महिन्यात ते नवीन पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांनी यापूर्वी २००२ ते २००५ या कालावधीत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने व्हिएतनाममध्ये झालेल्या एलजी करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते तर आफ्रो-आशियाई स्पर्धेत भारताला उपविजेतेपद मिळाले होते. भारतीय संघाचे यापूर्वीचे प्रशिक्षक विम कोएव्हरमन्स यांच्यापेक्षा कॉन्स्टन्टाइन यांना कमी मानधन दिले जाणार असल्याचे समजते.
भारताचा माजी कर्णधार बायचुंग भूतियाच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने कॉन्स्टन्टाइन यांच्याकडे पुन्हा प्रशिक्षकपद देण्याची शिफारस केली.