अजिंक्यपद मिळवण्याची क्षमता आमच्या खेळाडूंकडे होती. परंतु सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळेच आमचे विजेतेपद हुकले, असे भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांनी सांगितले. भारताला येथे शनिवारी झालेल्या दक्षिण आशियाई महासंघ फुटबॉल स्पर्धेतील (सॅफ) अंतिम फेरीत मालदीवकडून १-२ असा पराभव स्वीकारावा लागला.

‘‘भरपाई वेळेत आमच्या खेळाडूंनी गोल केला, परंतु तोपर्यंत मालदीवचे विजेतेपद निश्चित झाले होते. या सामन्यात आमच्या खेळाडूंनी अपेक्षेइतके कौशल्य दाखवले नाही. पाकिस्तानला उपांत्य फेरीत पराभूत करताना जो आक्रमक खेळ आम्ही केला होता. तसा खेळ त्यांनी अंतिम लढतीत केला असता तर आम्ही किमान दोन गोलच्या फरकाने हा सामना जिंकला असता,’’ असे कॉन्स्टन्टाइन यांनी सांगितले.

संघातील खेळाडूंनी या स्पर्धेत केलेल्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करताना कॉन्स्टन्टाइन म्हणाले, ‘‘गेल्या १०-१२ दिवसांमध्ये आमच्या खेळाडूंना भरपूर शिकावयास मिळाले आहे. संघातील बहुतांश खेळाडू २३ वर्षांखालील असल्यामुळे त्यांना भावी कारकीर्दीसाठी येथील अनुभव फायदेशीर होणार आहे. मालदीवविरुद्ध साखळी लढतीत आम्ही विजय मिळविला होता. अंतिम सामन्यात त्यांच्याबाबत आम्ही गाफील राहिलो नाही. अंतिम सामन्यातील दोन गंभीर चुकाच आमचा पराभव होण्यास कारणीभूत ठरल्या. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत बेशिस्त वर्तनाबद्दल लालियानाझुला छांगटे याला एक सामन्यात खेळण्यास बंदी घालण्यात आली. त्याची अनुपस्थिती आम्हाला जाणवली.’’

आम्ही साखळी गटात मालदीव संघावर सहज विजय मिळवला होता. या सामन्यांसह अंतिम फेरीत स्थान मिळेपर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये आमच्या खेळाडूंनी अव्वल दर्जाचा खेळ केला होता. पण या कामगिरीचे सातत्य त्यांना अंतिम सामन्यात ठेवता आले नाही.   – स्टीफन कॉन्स्टन्टाइन, भारताचे मुख्य प्रशिक्षक