‘‘न्यूझीलंड क्रिकेटमध्ये प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नव्हती. मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये न्यूझीलंडचा संघ नेहमीच चांगली कामगिरी करत होता. मात्र ब्रेंडन मॅक्क्युलमच्या नेतृत्वशैलीने खेळाडू आणि संघाचा दृष्टिकोनच पालटला. त्याच्या आक्रमक आणि सकारात्मक कार्यपद्धतीमुळे न्यूझीलंडच्या संघाने विश्वचषकात दिमाखदार कामगिरी केली. प्रतिभा असूनही निद्रिस्त झालेल्या न्यूझीलंड क्रिकेटला प्रगतिपथावर नेणाऱ्या बदलाचा शिल्पकार ब्रेंडन मॅक्क्युलमच आहे,’’ अशा शब्दांत न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगने मॅक्क्युलमला शाबासकी दिली आहे. ‘न्यूझीलंड एज्युकेशन’ उपक्रमाचा सदिच्छादूत असलेल्या फ्लेमिंगने गुरुवारी ‘लोकसत्ता’ कार्यक्रमाला भेट दिली. त्या वेळी तो बोलत होता.
फ्लेिमग पुढे म्हणाला, ‘‘मॅक्क्युलमने स्वत: शानदार खेळ करत संघासमोर उदाहरण ठेवले. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा तीव्र असते. अनेकदा खेळाडूंकडून मर्यादेचे उल्लंघन होते. मात्र न्यूझीलंडच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत खेळभावनेचा आदर करत खेळ केला. थरारक विजयानंतरही त्यांच्या वर्तनात उन्माद जाणवला नाही. आदर्श संघ म्हणून न्यूझीलंडने स्पर्धेत वेगळा ठसा उमटवला. खेळाडू अनेकांसाठी अनुकरणीय असतात. चाहत्यांचा विश्वास आणि प्रेम न्यूझीलंडच्या संघाने सार्थ ठरवले आणि म्हणूनच प्रत्येक सामन्यात त्यांना प्रचंड प्रतिसाद लाभला.’’
ट्वेन्टी-२० स्पर्धाचा फलंदाजीवर काय परिणाम झाला, याविषयी विचारले असता फ्लेमिंग म्हणाला, ‘‘ट्वेन्टी-२० हे फास्ट फूड आहे. या प्रकारात विचार करायला वेळच मिळत नाही. दडपण खूप असते. यामुळे पारंपरिक शैली बाजूला ठेवून अनोखे फटके खेळतात. कलात्मकतेऐवजी फलंदाजी ताकदीचा खेळ झाला आहे. मात्र सातत्याने ताकदवान फलंदाजी करणे आव्हानात्मक आहे. ए बी डी’व्हिलियर्स बदलत्या शैलीचे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक प्रकारानुसार खेळात कसा बदल करावा याचा वस्तुपाठ ए बीने घालून दिला आहे.’’
‘‘खेळांच्या व्यावसायिकीकरणामुळे खेळाडूंसमोरची आव्हाने वाढली आहेत. प्रायोजक, फ्रँचाइजी, संघव्यवस्थापन, प्रसारमाध्यमे या सगळ्यांना खेळाडू जबाबदार असतात. कामगिरीत सातत्य राखणे आणि त्याच वेळी विविध पातळ्यांवर वावरताना तोल ढळू न देता समतोल वागणे अशी दुहेरी जबाबदारी खेळाडूंवर आहे,’’ असे तो म्हणाला.
चेन्नई सुपर किंग्स संघ वादाच्या भोवऱ्यात असतानाचा कालखंड कसा होता, याविषयी विचारले असता फ्लेमिंग म्हणाला, ‘‘रोज नवीन बातम्या कानावर यायच्या. मात्र आम्ही सच्चे आहोत, याची आम्हाला खात्री होती. या काळात आम्हाला कोणताही त्रास होणार नाही याची फ्रँचाइजींनी पुरेपूर काळजी घेतली.जिंकण्यासाठी खेळणे हेच आमचे उद्दिष्ट असते आणि आहे. अग्निदिव्यातून आम्ही तावूनसुलाखून बाहेर पडलो. चाहत्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ दिला नाही. पारंपरिक माध्यमांच्या बरोबरीने खेळाडू आता समाजमाध्यमांद्वारे जगाशी जोडलेले असतात. चाहत्यांशी संपर्क राखण्याकरता हे व्यासपीठ चांगले असले तरी व्यक्त होताना, अनोळखी लोकांशी बातचीत करताना खेळाडूंनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.’’
‘‘भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संस्कृतीत साम्य आहे. मात्र प्रचंड लोकसंख्येमुळे भारतात राष्ट्रीय संघापर्यंत पोहोचण्याचा मार्ग खडतर आहे. विविध निमित्ताने मी सातत्याने भारतात येत असतो. भारत आता माझे दुसरे घरच झाले आहे,’’ अशा शब्दांत फ्लेमिंगने आपल्या भावना व्यक्त केल्या.

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी उत्सुक नाही
विश्वचषकासह भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपला. भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकपदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये फ्लेमिंगच्या नावाचा समावेश आहे. मात्र तूर्तास तरी या शर्यतीत आपण नसल्याचे फ्लेमिंगने स्पष्ट केले. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या यशात प्रशिक्षक फ्लेमिंग यांचा मोलाचा वाटा आहे. खेळाची सखोल जाण आणि संयमी स्वभाव यासाठी न्यूझीलंडचा माजी कर्णधार असलेला फ्लेमिंग ओळखला जातो. त्यामुळे भारतीय संघासाठी त्याच्या नावाची चर्चा आहे. ‘‘मी सलग २० वर्षे क्रिकेट खेळलो. तेव्हा मी कुटुंबीयांना वेळ देऊ शकलो नाही. तीन मुले आणि परिवाराला वेळ देणे, हे माझे प्राधान्य आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत मी नाही,’’ असे फ्लेमिंगने स्पष्ट केले.