अ‍ॅथलेटिक्ससारख्या विलोभनीय क्रीडा प्रकाराबाबत चाहत्यांमध्ये कमालीचे आकर्षण असते. पदकांची लयलूट करण्यासाठी हा हुकमी क्रीडाप्रकार असल्यामुळे विविध देशांचे खेळाडूही त्यासाठी खूप धडपड करीत असतात. या वर्षांत जागतिक मैदानी स्पर्धेतील खेळाडूंच्य्या कामगिरीपेक्षाही उत्तेजकाच्या मोठय़ा प्रकरणामुळे अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रास काळिमा फासली गेली.

जागतिक स्पर्धा ही आगामी ऑलिम्पिक्सपूर्वीची रंगीत तालीम मानली जाते. साहजिकच या स्पर्धेकडे सर्वाचे लक्ष वेधले गेले असते. अपेक्षेप्रमाणे उसेन बोल्ट, मोहम्मद फराह व शैली फ्रेझर यांनी यंदाही आपला दबदबा कायम राखला. नेहमीप्रमाणे या स्पर्धेतील पदक तालिकेत भारताची पाटी कोरीच राहिली. भारतीय खेळाडूंची आशियाई स्तरापर्यंतच मर्यादा आहे हे या वेळीही सिद्ध झाले. केनियाने पदकतालिकेत प्रथम स्थान मिळवीत निर्विवाद वर्चस्व गाजविले. त्यांनी जमेका व अमेरिका यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर फेकले. अर्थात रशियन अ‍ॅथलेट्सवर झालेली उत्तेजकविरोधी कारवाई हे यंदाचे वैशिष्टय़ ठरले. ही जरी खेळासाठी लाजिरवाणी गोष्ट असली तरी आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे नूतन अध्यक्ष व ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू सेबॅस्टीयन को यांनी जागतिक अ‍ॅथलेटिक्स क्षेत्र स्वच्छ करण्याच्या मोहिमेचाच हा एक भाग आहे. गेल्या काही वर्षांमध्ये उत्तेजकाला जवळ करा आणि ऑलिम्पिक पदक मिळवा असेच समीकरण झाले होते. त्यामुळे अ‍ॅथलेटिक्स क्षेत्राची बदनामी झाली होती. तरुणपणी उत्तेजकास जवळ करीत खेळाडू भविष्यातील धोकादायक आरोग्याची पायाभरणी करीत असतात हे कटू सत्य झाले आहे. को यांना खेळाडूंच्या जीवनावर होणारे अनिष्ट परिणाम माहीत असल्यामुळेच त्यांनी उत्तेजकविरहित अ‍ॅथलेटिक्स क्षेत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियन धावपटू उत्तेजक सेवन करतात व त्यांचे हे कृत्य लपविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे असे लक्षात आल्यानंतर को यांनी संयुक्त रशियन अ‍ॅथलेटिक्स महासंघावर बडतर्फीची कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे माजी अध्यक्ष लॅमिनी दियाक यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे दिसून आले व त्यांच्यावर फ्रान्समध्ये खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावरही हकालपट्टीची कारवाई को यांनी केली आहे. ही कारवाई धक्कादायक असली तरी या कारवाईपासून अन्य देशांचे खेळाडू व संघटक बोध घेतील अशीच को यांची अपेक्षा आहे.

उत्तेजकाबाबत भारतीय खेळाडू व संघटकांसाठी हा धोक्याचा इशारा आहे. आपल्या देशात किशोर गटापासून सर्व वयोगटापर्यंतच्या खेळाडूंमध्ये उत्तेजक सेवनाच्या घटना अनेक वेळा घडत असतात. पूर्वीच्या तुलनेत आता परदेशी प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण, परदेशातील स्पर्धामध्ये व प्रशिक्षण शिबिरात सहभाग, अद्यावत पूरक व्यायामाच्या सुविधा, आर्थिक उत्पन्नाची हमी आदी अनेक सवलती मिळत असल्या तरीही जागतिक स्पर्धेतून आपण रिकाम्या हाताने मायदेशी परत येतो असाच अनुभव आहे. यंदाचे वर्ष आगामी ऑलिम्पिकसाठी पात्रता पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे होते. आतापर्यंत इंदरजितसिंग (गोळाफेक), खुशबीर कौर (२० किलोमीटर चालणे), मनीष रावत (पुरुष २० किलोमीटर चालणे), संदीपकुमार (५० किलोमीटर चालणे), विकास गौडा (थाळीफेक), सपनाकुमारी ( २० किलोमीटर चालणे), ललिता  बाबर (मॅरेथॉन व ३ हजार मीटर स्टीपलचेस), ओ.पी जैशा (मॅरेथॉन), टिंटू लुका (८०० मीटर धावणे), सुधासिंग (मॅरेथॉन) यांनी ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण केली आहे.

इंदरजित याने गेल्या तीन वर्षांत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अव्वल यश मिळविले आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत इंदरजित, विकास, टिंटू यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. महाराष्ट्राचे आशास्थान असलेल्या ललिता हिने यंदा तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम करीत ऑलिम्पिकसाठी अपेक्षा उंचावल्या आहेत. ललिता, जैशा व सुधासिंग यांनी यंदा भारतात आयोजित केलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली आहे. टिंटू हिला जागतिक स्पर्धेत अपेक्षेइतकी चांगली करता आलेली नाही, मात्र तिने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने ऑलिम्पिक पात्रता निकष बदलले आहेत. त्याचा फायदा विकास, मनीष रावत व सपनाकुमारी या तीन भारतीय खेळाडूंना झाला आहे. ऑलिम्पिकसाठी अजून काही महिने बाकी असल्यामुळे भारतीय खेळाडूंनी पदक मिळविण्याचे स्वप्न कसे साकार करता येईल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

milind.dhamdhere@expressindia.com