युवा रियान परागने अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ३ गडी राखून कोलकात्यावर मात केली. कोलकात्याने दिलेलं १७६ धावांचं आव्हान राजस्थानच्या फलंदाजांनी खराब सुरुवात करुनही पूर्ण केलं. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ फारशी चमक दाखवू शकला नाही. अवघ्या दोन धावांवर सुनील नरिनने त्याचा त्रिफळा उडवला. मात्र या दोन धावांमध्येही स्मिथने आयपीएल कारकिर्दीत एक मोठा पल्ला गाठला आहे.

इंडियन प्रिमीअर लिग स्पर्धेत स्मिथने दोन हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. कोलकात्याविरुद्ध सामन्याआधी हा विक्रम करण्यासाठी त्याला अवघ्या दोन धावांची गरज होती, या दोन धावा केल्यानंतर तो नरिनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला.

काही दिवसांपूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या संघ प्रशासनाने अजिंक्य रहाणेच्या जागी स्टिव्ह स्मिथला संघाचं कर्णधारपद दिलं होतं. स्मिथच्या नेतृत्वाखाली राजस्थानच्या संघाने काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरीही केली. मात्र ३० एप्रिलरोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध सामन्यानंतर स्टिव्ह स्मिथ आपल्या मायदेशी परतणार आहे. आगामी विश्वचषकासाठी स्मिथची ऑस्ट्रेलियन संघात निवड झाली आहे. यासाठीच्या शिबीरात सहभागी होण्यासाठी स्मिथ ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.