दक्षिण आफ्रिकेकडे २९४ धावांची आघाडी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चेंडूशी छेडछाड केल्याची कबुली ऑस्ट्रेलियाचा फलंदाज कॅमेरून बेनक्रॉफ्ट आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने दिली आहे.

बेनक्रॉफ्ट चेंडू एका पिवळसर वस्तूशी घासत असल्याचे टेलिव्हिजन चित्रिकरणात आढळून आले आहे. याबाबत सामन्यानंतर तो म्हणाला, ‘‘मी चुकीच्या वेळी चुकीची गोष्ट केली. माझ्या या कृतीची मी कबुली देत आहे. पिवळी चिकटपट्टी मी वापरली होती.’’

मैदानावर उपस्थित पंचांशी बोलण्याअगोदर बेनक्रॉफ्टने आपल्या कपडय़ात लपवलेल्या एका वस्तूशी चेंडू घासल्याचे दिसून आले. याबाबत स्मिथ म्हणाला, ‘‘माझी चर्चा झाली होती. लाभ मिळवण्यासाठी हा एक उत्तम मार्ग ठरेल असे मला वाटले. मात्र आता या कृतीबाबत अतिशय खंत वाटते आहे.’’

महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने ‘ट्विटर’वर या घटनेबाबत नाराजी प्रकट केली आहे. याचप्रमाणे स्मिथला या घटनेची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

तत्पूर्वी, एडिन मार्कराम व एबी डी’व्हिलियर्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवसअखेरीस ५ बाद २३८ धावांची मजल मारली. अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला, त्यावेळेस डी’व्हिलियर्स ५१ आणि क्विंटन डी’कॉक २९ धावांवर खेळत होते.