सिडनी : कोपरावरील दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ पुन्हा सरावासाठी मैदानात परतला आहे. स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे पुन्हा तंदुरुस्त होऊन आयपीएलमध्ये प्रभावी कामगिरी करतील, अशी अपेक्षा असल्याचे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी व्यक्त केली.

स्मिथच्या कोपराला दुखापत झाल्याने त्याला बांगलादेशमधील प्रीमिअर लीग अर्धवट सोडून प्रथम शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. त्यानंतर तो हळूहळू दुखापतीमधून सावरत असून ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट मैदानावर त्याने सरावाला प्रारंभ केला आहे. पूर्वीप्रमाणे क्रिकेट खेळता येत असल्याचा आनंद असून आता दुखापत बरी झाल्याचेही स्मिथने सांगितले.

स्मिथने याबाबतचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर टाकले आहे. एका वर्षांच्या बंदीनंतर २९ मार्चपासून स्मिथ आणि वॉर्नर दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पात्र होणार आहेत. वॉर्नरला बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये कोपरालाच दुखापत झाल्याने त्याच्यावरही शस्त्रक्रिया करावी लागली होती. आता दोघेही सिडनीच्या मैदानावर सराव करीत आहेत.