चेंडू कुरतडल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथनं पत्रकार परिषदेत सगळ्या क्रीडाप्रेमींची माफी मागितली. बोलताना भावना अनावर झाल्याने डोळ्यातून अनेकवेळा त्याच्या पाणी आलं आणि आपण भयंकर मोठी चूक केल्याचं त्यानं मान्य केलं. कर्णधार म्हणून आपण चुकीचा निर्णय घेतल्याचं तो म्हणाला. माझं क्रिकेटवर प्रेम असून यातून बाहेर पडू असा विश्वास त्यानं व्यक्त केला.

जर या प्रकरणापासून इतर खेळाडूंनी बोध घेतला तर या प्रकरणातून काहीतरी चांगलं निष्पन्न झालं असं म्हणता येईल असं तो म्हणाला. उर्वरीत आयुष्यभर ही चूक विसरणार नाही असंही त्यानं म्हटलं आहे. जसा काळ जाईल त्याप्रमाणे मला लोकांचं प्रेम आणि आदर परत मिळेल अशी अपेक्षाही त्यानं व्यक्त केली आहे.

क्रिकेट हा जगातला सर्वोत्कृष्ट खेळ असून ते माझं सर्वस्व आहे. माझं आयुष्यच क्रिकेट असून अपेक्षा आहे की पुन्हा मी क्रिकेटचा भाग होईल असं त्यानं पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. ही घटना म्हणजे माझ्या नेतृत्वाचाच पराभव असल्याचं स्मिथनं डबडबत्या नयनांनी कबूल केलं आहे. दक्षिण अफ्रिकेतून मायदेशात परतल्यानंतर सिडनीमध्ये त्यानं पत्रकारांशी संवाद साधला.

माझ्या चुकीमुळे क्रिकेटचं जे काही नुकसान झालं आहे ते भरून येण्यासाठी आवश्यक ते सगळं काही आपण करू असं त्यानं सांगितलं. माफी मागण्यापूर्वी त्यानं हे स्पष्ट केलं की, “ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार या नात्यानं घडल्या प्रकाराची संपूर्ण जबाबदारी मी घेत आहे.” स्मिथला व वॉर्नरला एका वर्षासाठी क्रिकेटची बंदी घातली असून तिचा संदर्भ देत हा इतरांसाठी धडा असल्याचं स्मिथ म्हणाला. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचं नेतृत्व करायला मिळणं हा माझ्यासाठी एक खूपच मोठा सन्मान होता असं त्यानं भावनाविवश होत सांगितलं.