रायझिंग पुणे सुपरजाएंट्सच्या कर्णधारपदावरून यंदा महेंद्रसिंग धोनीला हटवून स्टीव्ह स्मिथकडे धुरा सोपविण्यात आली. पण ‘शेर तो आखिर शेर होता है’ धोनीच्या कर्णधारी सल्ल्याची गरज संघाला अनेकदा भासली. अटीतटीच्या सामन्यात स्मिथ गोंधळलेला असतानना धोनी त्याच्या मदतीसाठी धावून आलेला आपल्याला पाहायला मिळाला. नेतृत्त्व गुणांच्या बाबतीत धोनीची बरोबरी कुणीच करू शकत नाही हे जागतिक क्रिकेटमध्ये अनेक मातब्बर खेळाडूंनी मान्यही केलं. मग नेतृत्त्ववीर खेळाडूच्या उपस्थितीत संघाचे नेतृत्त्व करण्याची शिकवण मिळणे स्मिथसाठी मोठी संधीच ठरली.

नुकतेच रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघाचे खेळाडू सराव करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धोनीच्या सहवासात त्याचे हातखंडे बारकाईने शिकणाऱ्या स्मिथने सरावादरम्यान धोनीवर एका वेगळ्या पद्धतीने ‘नजर’ ठेवली. धोनी नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत असताना स्मिथ ‘ड्रोन कॅमेरा’ने त्याच्यावर लक्ष ठेवून होता. ‘ड्रोन कॅमेरा’ हाताळण्याचा अनुभव घेतला. धोनीलाही याचं अप्रूप वाटलं. त्यानेही ड्रोनमधून अनोखी दृश्य पाहण्याचा आनंद घेतला.