ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत ४०७ धावांच्या भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी चौथ्या डावात दमदार प्रत्युत्तर दिलं. भारताकडून ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा जोडीने चांगली खेळी केली. विशेषत: पंतने तडाखेबाज खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने पुजाराच्या साथीने पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात केली. पहिल्या सत्रात रहाणे लगेचच बाद झाला. पण त्यानंतर ऋषभ पंत आणि पुजाराने डाव सावरला. याचवेळी स्टीव्ह स्मिथने जे केलं ते पाहून नेटीझन्स त्याच्यावर चांगलेच संतापले.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही लोकांनी व्हिडीओ ट्विट करत स्टीव्ह स्थिमवर टीका केली आहे. क्रिकेट बॅचर या युजरने व्हिडीओ सोबत लिहिलेल्या कॅप्शननुसार, पंत आणि पुजारा दोघे फलंदाजी करत होते. जेव्हा ड्रिंक्स ब्रेक झाला तेव्हा पंत आणि पुजारा पाणी पिण्यासाठी बाजूला निघून गेले. खेळपट्टीवर आणि विशेषत: फलंदाजी करतात त्या जागेवर कोणी नसल्याचं पाहिल्यावर स्मिथ तेथे आला. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि त्यानंतर पंतने क्रीजवर फलंदाजीसाठी करून ठेवलेल्या खुणा पायाने पुसून टाकल्या. त्यामुळे पंतला खेळ सुरू झाल्यावर पुन्हा एकदा बॅटने पंचांच्या मदतीने गार्ड घेऊन त्या खुणा कराव्या लागल्या.

आणखी वाचा- “पंत भला तो सब भला”; तडाखेबाज खेळीनंतर ऋषभवर क्रिकेट विश्वातून कौतुकाचा वर्षाव

पाहा व्हिडीओ-

आणखी वाचा- IND vs AUS: ‘टीम इंडिया’ सुसाट!! विहारी-अश्विनच्या खेळीमुळे १२ वर्षांनंतर केला ‘हा’ पराक्रम

दरम्यान, पंतने त्यानंतर पुन्हा फलंदाजीला सुरूवात केली. पुजाराच्या साथीने त्याने तुफानी खेळी केली. त्याचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. पंतने १२ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करत ११८ चेंडूमध्ये ९७ धावा कुटल्या. नॅथन लायनच्या फिरकीपुढे तो बाद झाला. त्यानंतर काही वेळाने अत्यंत संयमी खेळी करणारा पुजारादेखील त्रिफळाचीत झाला. त्याने २०५ चेंडूत ७७ धावा केल्या.