ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिकेच्या चौथ्या सामन्यात इंग्लंडला १८५ धावांनी धूळ चारली. जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या पॅट कमिन्सने रविवारी लौकिकाला साजेशी कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने प्रतिष्ठेचा अ‍ॅशेस करंडक त्यांच्याकडेच राखून पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.

या सामन्यात स्टीव्ह स्मिथने द्विशतक ठोकत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारली. त्याच्या दमदार खेळीमुळेच ऑस्ट्रेलियाला मोठ्या संख्येने विजय मिळवणे शक्य झाले. स्मिथने आतापर्यंत अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिकेत २ शतके आणि १ द्विशतक ठोकले. पण तरीदेखील स्टीव्ह स्मिथ हा कायम चीटर म्हणूनच लक्षात राहिल, अशी टीका इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू स्टीव्ह हारमिसन याने केली आहे.

स्टीव्ह हारमिसन

“तुम्ही त्याला (स्मिथ) माफ करू शकत नाही. जेव्हा तुम्ही चीटर म्हणून ओळखले जाता, तेव्हा ते तुम्हाला ती गोष्ट नाकारता येत नाही. तुमच्यावर तो डाग कायम राहतो आणि तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो डाग तुम्हाला चिकटून राहतो. स्मिथने कितीही चांगली कामगिरी केली, तरी त्याने चेंडू कुरतडल्याचे प्रकरण कायम लक्षात राहिल. आतादेखील लोकांचे त्यांच्याबद्दलचे मत बदललेले मला दिसत नाही. कारण बॅनक्रॉफ्ट, स्मिथ आणि वॉर्नर या तिघांनी क्रिकेटच्या खेळाला बट्टा लागला,” असे परखड मत हारमिसनने व्यक्त केले.

 

चेंडू कुरतडल्याप्रकरणी आरोपी स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट

 

चेंडू कुरतडल्या प्रकरणी डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट या तिघांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कारवाई केली होती. स्मिथ आणि वॉर्नर या दोघांवर एका वर्षाची तर बॅमक्रॉफ्टवर ९ महिन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.