इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्याप्रसंगी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांची प्रेक्षकांनी हुर्यो उडवली.

चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी वॉर्नर आणि स्मिथ यांच्यावर लादलेल्या एक वर्षांच्या बंदीनंतर या दोन्ही खेळाडूंचे नुकतेच ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन झाले. शनिवारच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याच्यासमवेत दुसरा सलामीवीर म्हणून वॉर्नर जेव्हा मैदानावर दाखल झाला, त्यावेळी एका प्रेक्षकाने ‘फसवेगिरी करणारा वॉर्नर तू बाहेर निघ’ अशा स्वरूपाची घोषणा दिली. तसेच वॉर्नर मैदानावर येताच तोंडातून आवाज काढत प्रेक्षकांनी त्याची खिल्ली उडवली. त्यानंतर दोन गडी बाद झाल्यानंतर स्मिथ जेव्हा खेळायला आला, त्यावेळी त्यालादेखील ’चीट, चीट, चीट’ करून चिडवण्यात आले. स्मिथने प्रथम ५० आणि नंतर १०० धावा केल्यानंतरही काही प्रेक्षकांनी आवाज काढत त्याची चेष्टा केली.