बॉल टँपरिंग प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कप्तान स्टिव स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची तर चेंडू कुरतडणारा बँक्रॉफ्ट याच्यावर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जाहीर केला आहे. तसेच त्यांच्यावर आयपीएलमध्येही बंदी घालण्यात आली आहे. बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी बीसीसीआयनं यंदाच्या आयपीेलच्या मोसमात स्मिथ व वॉर्नर यांना खेळू न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे, असे वृत्त इंडिया टुडेनं दिलंय.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथनं दक्षिण अफ्रिकेविरोधातील सामन्यात चेंडू कुरतडल्याची कबुली दिला आणि संपूर्ण क्रिकेट विश्व हादरलं. कॅमेऱ्यावर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे कृष्णकृत्य कैद झाले असल्यामुळे त्यांना प्रतिवाद करण्यासही काही वाव नव्हता. स्मिथ, उपकर्णधार डेवि़ड वॉर्नर व बँक्रॉफ्ट या तिघांवर कारवाई होणार हे नक्की होते, फक्त काय कारवाई होणार ते स्पष्ट नव्हते. आज ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने कर्णधार व उपकर्णधार दोघांना एकेक वर्षासाठी क्रिकेटबंदी घातली असून बँक्रॉफ्टवर नऊ महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

आयपीएलमधल्या संघाच्या कर्णधारपदावरून स्मिथ व वॉर्नर दोघांची गच्छन्ती झाली असली तरी ते आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावरून स्मिथ व वॉर्नर दोघांनाही मायदेशी परत पाठवण्यात येत असून तिथं गेल्यावर स्मिथ प्रसारमाध्यमांशी बोलून आपलं म्हणणं सांगणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

बॉल कुरतडल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मंगळवारी कप्तान स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व कॅमेरॉन बँकरॉफ्ट या तिघांना दक्षिण अफ्रिकेतून मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणी संपूर्ण चौकशी करण्यात येत असून सविस्तर कारवाईबाबत तीन दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक डेरेन लेहमन याची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही तेच प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहेत.

स्टीव स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्ट हे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमावलीतील कलम २.३.५ नुसार नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. या खेळाडूंच्या जागी आता मॅट रेनशॉ, ग्लेन मॅक्सवेल आणि जो बर्न्स ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून खेळतील. टिम पेनची कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.