पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या तयारीचा भाग म्हणून इंडियन प्रीमियर लीगकडे पाहात असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने सांगितले.

चेंडूतील फेरफार प्रकरणामुळे स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना वर्षभरासाठी राष्ट्रीय संघातून निलंबित करण्यात आले होते. मात्र स्मिथला आगामी आयपीएलबाबत प्रचंड उत्सुकता वाटत आहे.

‘‘गेल्या काही काळापासून एकदिवसीय सामने हे ट्वेन्टी-२० सामन्यांचेच मोठे रूप असल्यासारखे खेळले जात आहेत. त्यामुळे आयपीएलची स्पर्धा ही माझ्या विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.अर्थात विश्वचषकासाठीच्या संघात माझी निवड झाल्यासच ते शक्य होणार आहे,’’ असे स्मिथने नमूद केले.

संघाकडून निलंबित झाल्यानंतर स्मिथने यापूर्वी कॅनडा आणि कॅरेबियन बेटांवरील ट्वेन्टी-२० स्पर्धामध्ये सहभागी होऊन त्याचा सामन्यांचा सराव कायम ठेवला आहे. आयपीएलमध्येदेखील तो राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता. मात्र या वादानंतर त्याची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

‘‘वर्षभर क्रिकेटपासून दूर राहणे ही माझ्या जीवनातील खूप मोठी घटना होती. मी स्वत: या काळात माझ्या शारीरिक आणि बौद्धिक तंदुरुस्तीवर भर दिला,’’ असेही स्मिथने सांगितले.