* डी’व्हिलियर्स वर्षांतील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू
* ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंची छाप
* भारतीय क्रिकेटपटू ठसा उमटवण्यात अपयशी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वार्षिक पुरस्कारांवर प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी छाप पाडली, मात्र भारताचे खेळाडू आपला ठसा उमटवण्यात अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि वर्षांतील सर्वोत्तम कसोटीपटू अशा दोन पुरस्कारांवर मोहर उमटवली.
आयसीसीचा वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूला देण्यात येणारा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार पटकावणारा स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा चौथा आणि एकंदर ११वा खेळाडू ठरला आहे. २००४ पासून सोबर्स पुरस्काराला प्रारंभ झाल्यानंतर रिकी पाँटिंग (२००६, २००७), मिचेल जॉन्सन (२००९, २०१४) आणि मायकेल क्लार्क (२०१३) या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी तो पटकावला आहे. याशिवाय राहुल द्रविड (२००४), अँड्रय़ू फ्लिंटॉफ आणि जॅक कॅलिस (२००५मध्ये संयुक्तपणे), शिवनारायण चंदरपॉल (२००८), सचिन तेंडुलकर (२०१०), जोनाथन ट्रॉट (२०११) आणि कुमार संगकारा (२०१२) या दिग्गज क्रिकेटपटूंनी सोबर्स पुरस्कार पटकावला आहे.
एकाच वर्षांत सोबर्स पुरस्कारासह वर्षांतील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार पटकावणारा स्मिथ हा सातवा क्रिकेटपटू ठरला आहे. द्रविड, कॅलिस, पाँटिंग, संगकारा, क्लार्क आणि जॉन्सन यांनी हा पराक्रम दाखवला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय संघनायक ए बी डी’व्हिलियर्सने सलग दुसऱ्या वर्षी वर्षांतील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला आहे. १८ सप्टेंबर २०१४ ते १३ सप्टेंबर २०१५ या कालावधीतील क्रिकेटपटूंची कामगिरी ग्राह्य धरण्यात आली. २६ वर्षीय स्मिथने या काळातील १३ कसोटी सामन्यांत ८२.५७च्या सरासरीने सर्वाधिक १७३४ धावा केल्या आहेत. यात सात शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. याचप्रमाणे २६ एकदिवसीय सामन्यांत त्याने ६०च्या सरासरीने १२४९ धावा केल्या आहेत. यात चार शतके आणि आठ अर्धशतकांचा समावेश आहे. २०१५च्या पूर्वार्धात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड भूमीवर विश्वविजेतेपद जिंकण्याची किमया साधणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघात स्मिथचा समावेश होता.
डिसेंबरच्या पूर्वार्धात आयसीसीच्या क्रिकेट समितीचे प्रमुख अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखालील समितीने जाहीर केलेल्या वर्षांतील सर्वोत्तम कसोटी व एकदिवसीय अशा दोन्ही संघांमध्ये स्मिथचा समावेश होता. आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी स्मिथचे अभिनंदन केले आहे.
डी’व्हिलियर्सने २०१०नंतर दुसऱ्यांदा सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू हा पुरस्कार जिंकला. त्याने २० डावांमध्ये ७९पेक्षा अधिक धावसरासरीने आणि १२८.४च्या स्ट्राइक रेटने १२६५ धावा केल्या आहेत. त्याने दोन शतके आणि नऊ अर्धशतके नोंदवली आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व डी’व्हिलियर्सकडे देण्यात आले होते. त्याचा सहकारी आणि दक्षिण आफ्रिकेचा ट्वेन्टी-२० कर्णधार फॅफ डू प्लेसिसला सर्वोत्तम ट्वेन्टी-२०मधील कामगिरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याने ११ जानेवारी २०१५ या दिवशी जोहान्सबर्ग येथे विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात ५६ चेंडूंत ११९ धावा केल्या होत्या. या धुवाँधार खेळीत प्लेसिसने ११ चौकार आणि पाच षटकार ठोकले होते.
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची कर्णधार मेग लॅनिंगचे वर्षांतील सर्वोत्तम महिला एकदिवसीय क्रिकेटपटू या पुरस्कारासाठी नाव निश्चित करण्यात आले आहे. विंडीजची कर्णधार स्टेफनी टेलरला पहिल्यांदाच वर्षांतील सर्वोत्तम महिला ट्वेन्टी-२० क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हॅझलवूडची वर्षांतील सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. संयुक्त अरब अमिरातीचा माजी कर्णधार खुर्रम खानची आयसीसीच्या सहसदस्य आणि संलग्न देशांसाठीचा वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार घोषित झाला आहे. त्याने नऊ एकदिवसीय सामन्यांत ४२५ धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमला क्रिकेट संघभावनेचा पुरस्कार देण्यात येणार आहे. संघाला प्रेरणा देऊन त्याने किवी संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचवले होते. याचप्रमाणे उपान्त्य फेरीच्या रंगतदार सामन्यानंतर त्याने खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करून डी’व्हिलियर्सच्या संघाला ड्रेसिंग रूममध्ये बोलावले होते.
रिचर्ड केटलेबोरोघ यांनी आयसीसीचा सर्वोत्तम पंचाचा डेव्हिड शेफर्ड पुरस्कार सलग तिसऱ्यांदा पटकावला आहे. सायमन टॉफेल (२००४ ते २००८) आणि आलीम दर (२००९ ते २०११) यांच्यानंतर शेफर्ड पुरस्काराची हॅट्ट्रिक साकारणारे केटलेबोरोघ हे तिसरे पंच ठरले आहे.
आयसीसीचा वर्षांतील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून घोषणा होणे, हा मी सन्मान समजतो. अनेक संस्मरणीय घटनांमुळे हे वर्ष माझ्यासाठी महत्त्वाचे ठरले. परंतु अनेक निराशाजनक घटनाही घडल्या. वाँडर्स येथे वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावलेले शतक हे माझ्यासाठी वर्षांतील सर्वात खास ठरले. संघ जिंकला नाही, तर शतकाचे मोल उरत नाही. त्यामुळे भविष्यात आफ्रिकेला जिंकून देणाऱ्या अधिकाधिक खेळीचे योगदान देईन, अशी आशा आहे.
-ए बी डी’व्हिलियर्स, दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज

जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचे हे पुरस्कार मिळणे, हा माझा सन्मान आहे. संघाचे यश, हेच नेहमी माझे पहिले ध्येय असते. त्यामुळेच हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे. मला अतिशय आनंद झाला असून, हे पुरस्कार स्वीकारताना अभिमान वाटतो आहे. २०१५ हे वर्ष माझ्यासाठी संमिश्र स्वरूपाचे ठरले. मायदेशात विश्वचषक जिंकण्याची किमया साधणे हा कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण ठरला. मग ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व सोपवून माझा गौरव करण्यात आला. मात्र अ‍ॅशेस गमावल्याचे मला अतीव दु:ख झाले.
-स्टीव्ह स्मिथ, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

१. वर्षांतील सर्वोत्तम क्रिकेटपटू (गॅरी सोबर्स पुरस्कार)
२. वर्षांतील सर्वोत्तम कसोटीपटू