भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा आक्रमक आणि काहीसा भावनाविवश असल्यामुळे त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरुद्ध खेळण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ याने सांगितले.
‘‘बऱ्याच वर्षांपासून महेंद्रसिंग धोनी हा भारताचा अद्वितीय कर्णधार होता. याबद्दल कोणतीही शंका नाही. अ‍ॅडलेड येथील पहिल्या कसोटीत धोनीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची धुरा सांभाळताना कोहलीने शानदार कामगिरी केली होती. कोहली हा भावनाविवश असून अनेक निर्णयांमध्ये त्याच्या सहभाग असतो. ही मालिका आम्ही जिंकली असली तरी नवा कर्णधार लाभलेल्या भारतीय संघाविरुद्ध खेळण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत,’’ असे स्मिथने सांगितले.
तो म्हणाला, ‘‘सिडनी हे माझे घरचे आणि सर्वात आवडते मैदान असून येथे खेळणे, हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण असतो. सिडनीची खेळपट्टी चांगली दिसत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत खेळपट्टीवर कमी गवत ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या डावात खेळपट्टीकडून रिव्हर्स स्विंग मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल ठरेल, असा अंदाज आहे.  ’’
ह्य़ूजबाबत स्मिथ म्हणाला, ‘‘ह्य़ूज हा ऑस्ट्रेलिया संघाचा एक भाग होता. सिडनी मैदानावर त्याचे भित्तीचित्र लावण्यात येणार असून त्यासमोरून जाताना आम्हाला चांगली कामगिरी करण्याचे नवे बळ मिळेल, अशी आशा आहे. ’’