स्टिव्हन स्मिथही स्पर्धेला मुकणार
रायझिंग पुणे सुपरजायंट्स या आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या संघाकडून चाहत्यांना फार मोठय़ा अपेक्षा होत्या. पण त्यांच्याकडून अपेक्षाभंग झाला असून संघात फक्त दुखापतींचेच रायझिंग सुरू असल्याचे समोर येत आहे. संघातील फलंदाज आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथला दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलला मुकावे लागणार असून संघासाठी हा फार मोठा धक्का असेल. कारण यंदाच्या मोसमात दुखापतग्रस्त होऊन स्पर्धा सोडावी लागणारा हा पुण्याचा चौथा खेळाडू आहे. स्मिथच्या मनगटाला दुखापत झाली असून ती गंभीर स्वरुपाची असल्याचे समजते.
यापूर्वी इंग्लंडचा माजी तडफदार फलंदाज केव्हिन पीटरसनच्या पायात मैदानात गोळे आले होते. त्याचे स्नायू ताणले गेले होते. त्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यात आले, पण त्याची ही दुखापत गंभीर स्वरूपाची असल्यामुळे त्याला स्पर्धेला मुकावे लागले आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा ट्वेन्टी-२० कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श हेदेखील जायबंदी आहेत.
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे पुण्याच्या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. पण धोनीला पुण्याच्या संघाला मोठे यश मिळवून देता आलेले नाही. आतापर्यंत पुण्याला फक्त दोनच सामने जिंकता आले आहेत.
शॉन मार्शही दुखापतग्रस्त
मोहाली : किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा भरवशाचा फलंदाज शॉन मार्शने पाठीच्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांमधून माघार घेतली आहे. सर्व हंगामात पंजाबचा तारणहार असलेल्या मार्शच्या दुखापतीमुळे पंजाबचे आव्हान कमकुवत झाले आहे. पंजाबने बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही.