बांगलादेशला १-० ने हरवल्यानंतर ऑस्ट्रेलियाला ४-० ने हरवण्यास भारतीय संघ सज्ज झाला आहे. जर भारताने ऑस्ट्रेलियाला ४-० असा व्हाइटवॉश दिला तर भारताकडून एका नवा विक्रम रचला जाईल आणि ऑस्ट्रेलियाचा १०-० पराभव होईल. ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतामध्ये सलग सहा कसोटी सामने हरले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात ही कसोटी मालिका होणार आहे आणि या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाला व्हाइटवॉश देण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे.

मागील वर्षी ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेच्या संघासमोर शरणागती पत्करली होती. ऑस्ट्रेलियाचा संघ ३-० अशा फरकाने हरला होता. ऑस्ट्रेलियाचा संघ सर्व तयारीनिशी मैदानावर उतरला होता परंतु श्रीलंकेसमोर त्यांना नांगी टाकावी लागली होती. भारतीय उप-खंडात आल्यानंतर त्यांचे खेळाडू नेहमीच फिरकी गोलंदाजांसमोर गुडघे टेकतात त्यामुळे त्यांनी सलग पराभवांना सामोरे जावे लागले.

भारतच नव्हे तर आशियामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतामध्ये खेळलेल्या शेवटच्या १० कसोटी सामन्यांपैकी ८ सामने गमवले आहेत. २००१ ते २००६ हा काळ ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी सुवर्णकाळ होता. या काळात ऑस्ट्रेलियाने १२ कसोटी सामन्यांपैकी १० कसोटी सामने जिंकले होते आणि एक गमवला होता. एक सामना अनिर्णित राहिला होता. तर २००७ ते २०११ या काळात झालेल्या ७ सामन्यांपैकी ते केवळ १ सामना जिंकले आहेत.

इतिहासही भारताच्याच बाजूने

१९६९ ते २००४ या काळात भारतात झालेली एकही कसोटी मालिका ऑस्ट्रेलिया जिंकू शकला नाही. २००१ साली जेव्हा स्टीव्ह वॉ भारतात आला होता त्यावेळी त्याचा संघ सर्वोत्कृष्ट म्हणून गणला जात होता परंतु सौरव गांगुलीच्या नेतृत्वातील भारतीय संघासमोर ते २-१ ने हरले होते. २००४ मध्ये अॅडम गिलख्रिस्टच्या नेतृत्ताखाली त्यांना एक मालिका जिंकता आली होती. ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर नतमस्तक होतो. सध्या आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचा फॉर्म पाहता एखादा चमत्कारच त्यांना तारू शकेल असे वाटते.