ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने प्रतिष्ठेचे अ‍ॅलन बोर्डर पदक जिंकले. त्याने दुसऱ्यांदा या पदकावर नाव कोरले. महान माजी क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सवरेत्कृष्ट फलंदाज गणल्या जाणाऱ्या स्मिथला २४६ मते पडली. त्याने दोन वेळचा पदक विजेता सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (१६२ मते) आणि फिरकीपटू नॅथन लियॉनला (१५६ मते) मागे टाकले.

ऑस्ट्रेलियाचा यंदाचा वर्षांतील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार मिळवलेल्या स्मिथने २०१५मध्ये बोर्डर पदक जिंकले होते. २४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६७.४६ सरासरीने १७५४ धावा करणारा स्मिथ यंदा बोर्डर पदकासाठी प्रबळ दावेदार होता.

यंदा स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला भारतात मात खावी लागली. बांगलादेशने मालिका बरोबरीत सोडवली. मात्र घरच्या मैदानावर अ‍ॅशेस मालिकेमध्ये इंग्लंडवर ४-० असा विजय मिळवत स्मिथ आणि सहकाऱ्यांनी मागील अपयश धुवून टाकले. अ‍ॅशेसमध्ये स्मिथची बॅट तळपली. त्याने मालिकावीराचा पुरस्कार पटकावला.