इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वन-डे विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. न्यूझीलंडने भारतावर मात करत अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेनंतर एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने धोनीला विश्रांती देऊन ऋषभ पंतला भारतीय संघात जागा दिली. धोनीसोबत संघातला आणखी एक यष्टीरक्षक म्हणजेच दिनेश कार्तिकनेही संघातली आपली जागा गमावली. गेले अनेक महिने दिनेश आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासू दूर आहे. तरीही आपण आजही तितक्याच जोशात टी-२० क्रिकेट खेळू शकतो असं दिनेशने म्हटलंय, तो पीटीआयशी बोलत होता.

“टी-२० क्रिकेटमधली माझी कामगिरी चांगली राहिलेली आहे. विश्वचषकात मी चांगला खेळ करु शकलो नाही, वन-डे संघात मला स्थान मिळत नाही हे मी समजू शकतो, पण टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघात स्थान मिळवण्याची मला अजुनही संधी आहे. मी विश्वचषकानंतर ज्या स्थानिक सामन्यांमध्ये खेळलो त्यातही मी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे टी-२० संघात मला संधी मिळणार नाही असं मला अजिबात वाटत नाही”, कार्तिक स्वतःच्या खेळाबद्दल बोलत होता.

दिनेश कार्तिकने आतापर्यंत २६ कसोटी, ९४ वन-डे आणि ३२ टी-२० सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. गेली १५ वर्ष तो भारतीय संघाकडून क्रिकेट खेळतो आहे. मात्र त्याला कायमस्वरुपी संघात स्थान राखता आलेलं नाही. आयपीएलमध्ये दिनेश कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व करतो, मात्र यंदा करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.