जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीने (वाडा) दोहा येथे उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला अधिकृत मान्यता दिली आहे. आशिया खंडातील ही आठवी प्रयोगशाळा आहे.
‘वाडा’ने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. दोहा येथे गतवर्षी ही प्रयोगशाळा स्थापन करण्यास सुरुवात झाली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तेजक सेवनाच्या घटना कमी व्हाव्यात, खेळाडूंना उत्तेजक सेवनाच्या दुष्परिणामांची तीव्रता कळावी, उत्तेजक प्रतिबंधक कार्यक्रम राबविण्यासाठी कतार येथील प्रयोगशाळा उपयुक्त ठरणार आहे. वाडा संस्थेद्वारे नियमित या प्रयोगशाळेस भेट दिली जाणार असून या प्रयोगशाळेच्या कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल.
दोहा येथील प्रयोगशाळा ही जगातील ३५ वी प्रयोगशाळा आहे. कतारमध्ये जागतिक दर्जाच्या अनेक स्पर्धाचे नियमितरीत्या आयोजन केले जात असते. त्यामुळे ही प्रयोगशाळा तेथील क्रीडाविकासात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा ‘वाडा’ संस्थेने व्यक्त केली आहे. आशिया खंडात भारत, टर्की, कझाकिस्तान, थायलंड, चीन, दक्षिण कोरिया, जपान या देशांमध्ये वाडातर्फे प्रयोगशाळा कार्यरत आहेत.