News Flash

उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरण : भारतीय कुस्ती महासंघाला सुमितमुळे १६ लाखांचा दंड

कुस्तीमधून उत्तेजकांचा समूळ नायनाट करण्यासाठी ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’ने कठोर पावले उचलली आहेत.

कुस्तीपटू सुमित मलिक उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात दोषी आढळल्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाला (डब्ल्यूएफआय) दुहेरी फटका सहन करावा लागणार आहे. ‘डब्ल्यूएफआय’ला टोक्यो ऑलिम्पिकमधील स्थान गमवावे लागणार आहे. त्याचबरोबर १६ लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे.

गेल्या महिन्यात बल्गेरिया, सोफिया येथे झालेल्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेत सुमितने १२५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावत टोक्यो ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले. याच स्पर्धेदरम्यान झालेल्या उत्तेजक चाचणीत सुमित दोषी आढळला आहे. जागतिक कुस्ती महासंघाने (यूडब्ल्यूडब्ल्यू) सुमितवर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली असून डिसेंबर २०२१मध्ये त्याचा ब नमुना चाचणी अहवाल येणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्याला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही. सुमित दोषी आढळल्यामुळे ‘डब्ल्यूएफआय’ला १६ लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. आता ब नमुना चाचणीतही सुमित दोषी आढळला तर त्याच्यावर आजीवन बंदी येण्याची शक्यता आहे. त्यानंतरही ‘डब्ल्यूएफआय’ त्याच्याकडून ही दंडाची रक्कम वसूल करू शकते.

कुस्तीमधून उत्तेजकांचा समूळ नायनाट करण्यासाठी ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’ने कठोर पावले उचलली आहेत. एखादा खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळला तर त्याच्या राष्ट्रीय संघटनेला १६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो. टोक्यो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सुमितला हरियाणा सरकारने पाच लाख रुपयांची मदत केली होती, आता त्याला ही रक्कम परत करावी लागणार आहे.

सोनम, सीमा सराव शिबिराला मुकणार

सोनम मलिक आणि सीमा बिसला या महिला कुस्तीपटू जायबंदी असल्याने पोलंडमधील वॉरसॉ येथे सोमवारपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिकपूर्व सराव शिबिराला मुकणार आहेत. सोनम आणि सीमाचा दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीत समावेश झाल्याने आता रवी दहिया, दीपक पुनिया आणि अंशू मलिक हे तिघेच कुस्तीपटू शनिवारी पोलंडला रवाना होणार आहेत. या शिबिराचा समारोप ५ जुलै रोजी होणार असून सोनमने ६२ किलो तर सीमाने ५० किलो वजनी गटात ऑलिम्पिकसाठी स्थान निश्चित केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 12:00 am

Web Title: stimulus intake case sumit due to the indian wrestling federation akp 94
Next Stories
1 ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा भारताबाहेर?
2 जागतिक अजिंक्यपदासाठी भारताचे पारडे जड – गावस्कर
3 अझरबैजान फॉर्म्युला-वन शर्यत : फेरारीच्या लेकलेर्कला अव्वल स्थान
Just Now!
X