अवघ्या दीड वर्षांपूर्वी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने विश्वचषक उंचावला.. आपण जगज्जेते झालो.. जागतिक क्रिकेटवर यापुढे अनेक वर्ष भारतीय क्रिकेटचे वर्चस्व राहणार, अशी आशा या घटनेने क्रिकेटरसिकांनी जागवली.. पण प्रत्यक्षात वेगळेच झाले. जगज्जेत्यांचा कैफ उतरला आणि कटू सत्याने टीम इंडियाला आपली जागा दाखवली. विदेशी भूमीवर भारतीय संघ हरतो, म्हणता म्हणता मायभूमीतही चीतपट होण्याची आफत क्रिकेट संघावर ओढवली.
वर्षांचे ३६५ दिवस अन् २४ तास सतत क्रिकेटचा रतीब सुरू आहे. त्याचे आता अजीर्ण होऊ लागलेय का? वर्षभर कसोटी, एकदिवसीय मालिका, ट्वेन्टी-२० वर्षभर येणारे आयपीएल, चॅम्पियन्स लीग आदींची सुगी असतेच, याशिवाय रणजी, दुलीप, इराणी यांसारख्या स्थानिक क्रिकेट स्पर्धाचा हंगामही बहरत असतो. व्यावसायिक गणितांच्या पायावर उभा असलेला क्रिकेट नामक मॉल वर्षभर बहरलेला असतो. क्रिकेटचा अर्थवेलू असा गगनावेरी जात असताना, अन्य खेळ आणि खेळाडूंचा आलेख मात्र खालावताना दिसतो आहे. असे का? सचिनने निवृत्ती घ्यावी का, कधी घ्यावी, धोनीने कर्णधारपद सोडावे का यावर तावातावाने चर्चा करणारे क्रिकेटरसिक अन्य खेळांतील क्रीडापटूंसाठी जराशी आस्था का दाखवत नाहीत?
समृद्ध क्रीडासंस्कृतीचे संचित हाती असताना फक्त क्रिकेटलाच व्हीआयपी वागणूक का मिळते? क्रिकेटशी जोडले गेल्यावर आपोआप क्रिकेटपटूंना ‘छप्पर फाड के’ पैसा, प्रसिद्धी मिळते. असे भाग्य अन्य क्रीडापटूंच्या ललाटी का नाही? क्रिकेटपटूंइतकेच, किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिक देदिप्यमान यश मिळवूनही ही सर्व मंडळी बॅकफूटवरच का राहतात? हे संपवायचे असेल, तर क्रिकेटचा हा अतिरेकी खेळ बंद करण्याची गरज आहे का?
लोकसत्ता ‘लाऊडस्पीकर’ या कार्यक्रमात क्रिकेट तसेच अन्य खेळातील जाणकार याच विषयावर आपली मते मांडणार आहेत. बुधवारी दुपारी ३ ते ५ या वेळात एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट येथे ही चर्चा रंगणार आहे.
महिला विश्वचषक कबड्डी विजेत्या संघातील सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे, महाराष्ट्र नेमबाजी संघटनेच्या उपाध्यक्षा शीला कनुंगो, मैदान बचाव समितीचे अध्यक्ष भास्कर सावंत, मल्लखांब प्रशिक्षिका नीता ताटके, आंतरराष्ट्रीय हॉकीपटू युवराज वाल्मीकी, तसेच क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड आपली मते आणि अनुभव कथन करणार आहेत.