भारत-पाकिस्तान यांच्या द्विराष्ट्रीय क्रिकेट मालिका पुन्हा सुरू व्हाव्यात, याकरिता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) मनधरणी करणे थांबवावे, अशी विनंती पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक जावेद मियाँदादने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) केली आहे.

भारतीय नेते आणि मंत्री हेच या दुर्दैवी स्थितीला जबाबदार आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध पुनप्र्रस्थापित व्हावे, याकरिता ते कोणतीही मदत करणार नाहीत, असा खळबळजनक आरोप मियाँदादने आपल्या भाषणात केला.
शनिवारी रात्री एका कार्यक्रमात मियाँदाद म्हणाला, ‘‘माझ्या खळबळजनक विधानामुळे भारतातील तथाकथित मंडळींच्या पाकिस्तानबाबतच्या मतामध्ये फरक पडेल आणि भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील, असे मला वाटत नाही.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘भारतीय क्रिकेट मंडळाची वृत्ती पाहता मी पीसीबीला सल्ला देईन की, त्यांनी त्यांची मनधरणी करू नये. यापेक्षा अन्य संघांशी मालिकांचे नियोजन करण्याकडे लक्ष केंद्रित करावे. क्रिकेटमध्ये पाकिस्तान हा नेहमीच भारतापेक्षा सरस ठरला आहे. भारताचे क्रिकेट हे फक्त पैसा आणि व्यावसायिकीकरण यांच्या बळावर टिकले आहे.’’