News Flash

एका बाबाची कहाणी..

आई या नात्याचं महत्त्वच इतकं विराट असतं, की त्यामुळे अनेकदा बाप हा दुर्लक्षितच राहतो. बापाच्या भावनिकतेचं चित्रण

| September 15, 2013 06:07 am

आई या नात्याचं महत्त्वच इतकं विराट असतं, की त्यामुळे अनेकदा बाप हा दुर्लक्षितच राहतो. बापाच्या भावनिकतेचं चित्रण आपल्या साहित्य आणि कला संस्कृतीमध्ये आईइतक्या ताकदीनं आणि ठळकपणे चित्रित झालेलं नाही. त्याच्या प्रेमाला, उदात्ततेला, मायेला नेहमीच आईपेक्षा कमीच स्थान मिळालेलं आहे. क्वचित कधीतरी ‘दूर देशी गेला बाबा..’ किंवा ‘दमलेल्या बाबांची कहाणी..’ अशी गाणी ऐकू येतात आणि क्षणभर सर्वाच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात.. ही झाली सर्वसामान्य बाबांची कहाणी. सेलिब्रिटी बाबांची कथा याहून अधिक वेगळी असते. आकर्षक तितकीच उदासवाणी असते. अशीच ही एक कथा आहे एका सेलिब्रेटी बाबांची. अखंड क्रिकेटविश्व ज्याच्यावर निस्सीम प्रेम करतं त्या सचिन तेंडुलकरची. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात सचिनने प्रसारमाध्यमांना आवाहन केलं होतं की, ‘‘माझ्याशी अर्जुनची तुलना करू नका. त्याला स्वत:ची ओळख निर्माण करू द्या. या तुलनेमुळे त्याच्यावर दडपण येईल. १४ वर्षांच्या अन्य मुलाप्रमाणेच त्याला जगू द्या.’’ सचिनच्या या विनंतीवजा स्पष्टोक्तीचा मथितार्थ असा की, ‘सध्या माझ्या निवृत्तीसाठी जसा तुम्ही पाठपुरावा करीत आहात, तसा माझ्या मुलाच्या कामगिरीचा पिच्छा पुरवू नका.’ यावेळी सचिननं एक दाखला दिला होता, की ‘‘मी क्रिकेट खेळू लागलो, तेव्हा कधी कुणी माझ्या प्राध्यापक वडिलांशी माझी तुलना केली नव्हती.’’ सचिन नावाच्या बापाची कैफियत ही कुणालाही भावनावश करणारी आहे.
गेल्याच रविवारी अर्जुननं कांगा क्रिकेट स्पध्रेच्या निमित्तानं आपल्या व्यावसायिक क्रिकेटला सुरुवात केली. दुर्दैवानं तो फक्त एक धाव काढून तंबूत परतला. त्यामुळे ‘सचिनचा मुलगा अर्जुनची अपयशी सुरुवात’ अशा प्रकारे प्रसारमाध्यमांनी ढोल पिटले. या टीकेमुळेच अस्वस्थ होऊन सचिनने योग्य व्यासपीठ पाहून आपल्या मुलाच्या दडपणमुक्त कारकिर्दीसाठी प्रसारमाध्यमांकडेच जोगवा मागितला. यावेळी मुलांना संरक्षित करणारा बाप असं त्याचं हळवं रूप जगासमोर आलं. कांगा लीगच्या त्या सामन्याला केवळ सचिनचा मुलगा या नात्यानंच ही प्रसारमाध्यमांची उत्सुकता ताणली होती, यात तथ्य होतं. पण वडिलांचं सेलिब्रेटीपण मुलाला पेलवेलच, याची खात्री कशी देणार? लिटल मास्टर सुनील गावस्कर हा भारतीय खेळाला लाभलेला पहिला नायक. त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून त्याचा मुलगा रोहन गावस्कर क्रिकेट कारकीर्द घडवेल, अशी सुनीलप्रमाणेच तमाम क्रिकेटजगताला आशा होती. पण ती फोल ठरली. ‘बिग बी’ अमिताभ बच्चनइतकी अभिनयातील उंची अभिषेक बच्चनला तरी गाठता येईल का? अशी अनेक उदाहरणे आपल्याला क्रीडा, चित्रपट, वगैरे आदी चमचमत्या क्षेत्रात आढळतात. यापैकी तारे घडवणारी अनेक घरं आपलं लक्ष वेधून घेतात. त्यामुळे ही तुलना होणं आणि त्याची किंमत भोगावी लागणं, हे स्वाभाविक आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनने आपला ३० सदस्यीय १४ वर्षांखालील संघ जाहीर केला. परंतु अर्जुनच्या खराब कामगिरीमुळे त्याला या संघात स्थान मिळवता आले नाही. यावेळी एका जाणकाराने व्यक्त केलेले मत लक्षात घेण्याजोगे आहे, ‘‘अर्जुनच्या प्रशिक्षणकार्यात अनेक जण गुंतलेले आहेत. परंतु त्याचे क्षेत्ररक्षण दर्जात्मक पद्धतीने होत नाही. यामध्ये त्याने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. त्याची फलंदाजी चांगली आहे, परंतु आपल्या खेळीचे मोठय़ा धावसंख्येत रूपांतर करण्यात तो अपयशी ठरतो.’’ याच अर्जुनच्या निवडीवरून जानेवारी महिन्यात रणकंदन माजले होते. त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी बजावणारे खेळाडू संघाबाहेर असताना अर्जुनची निवड कशी झाली, याबाबत खमंग चर्चा रंगली.
परंतु क्रिकेटजगतात देवपण लाभलेल्या बापाचं दु:ख आणि यातना जशा मुलाच्या विकासाच्या वाटेवर अडथळ्याप्रमाणे उभ्या राहतात, तसंच त्याचं मोठेपण त्याला इथवरच्या मार्गात का होईना ‘रेड काप्रेट’ ठरतं, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. सचिनचा मुलगा असल्यामुळे अर्जुनला जे भाग्य लाभतं आहे, ते अन्य कुणा मुलाला लाभलं होतं का? या नाण्याच्या दुसऱ्या बाजूचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. याच कांगा सामन्यात अर्जुननं आपल्या डावखुऱ्या मध्यमगती गोलंदाजीच्या बळावर एक बळीही मिळवला. या सामन्याच्या तयारीसाठी त्याने एमसीएच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर झहीर खानसोबत सराव केला. याचप्रमाणे अजित आगरकर आणि युवराज सिंग यांचेही मार्गदर्शन त्याला यावेळी लाभले. अर्जुनसोबत सराव करताना युवीला आपले बालपण आठवले. पण तुलना जरी केली तरी युवीचे बालपण हे अर्जुनपेक्षा अधिक कष्टाचे होते. कारण बापाच्या अधुऱ्या स्वप्नांतूनच युवराजच्या तळपत्या कारकिर्दीचा जन्म झाला आहे, हे सर्वानाच माहीत आहे.
२०११चा विश्वचषक भारतानं जिंकल्यावर वानखेडे स्टेडियमवरील आनंदाला आणि जल्लोषाला पारावार नव्हता. भारतीय क्रिकेटची दोन दशकांहून अधिक काळ सेवा करणाऱ्या सचिनचं विश्वचषकाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारल्यावर स्वाभाविकपणे संघातील साऱ्या खेळाडूंनी हे जगज्जतेपद आपल्या लाडक्या खेळाडूला समर्पित केले. पण या ऐतिहासिक क्षणी मैदानावर सचिनची पत्नी अंजली, मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा हेसुद्धा होते. मैदानावर कुणालाही जाण्याची परवानगी नसते, परंतु फक्त सचिनमुळे हे कुटुंब मैदानावर वावरू शकले. आता आयपीएल गैरप्रकारानंतर तर त्याविषयीचे नियम अधिकच काटेकोर करण्यात आले आहेत. मग केवळ सचिनचे कुटुंबीय हे निकष लावून त्यांना विशेष आनंद साजरा करण्याचा अधिकार कसा काय देण्यात आला? तमाम भारतीयांनाही मैदानावर जाऊन असा आनंद साजरा करायला आवडला असता. लॉर्ड्सवर १९८३मध्ये जेव्हा भारतानं विश्वचषक जिंकला होता, तेव्हा अख्ख्या मैदानावर तिरंगा घेतलेला विशाल जनसागर पसरला होता.
त्याच वर्षी भारतीय संघ इंग्लंडला गेला आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत सपाटून मार खाऊन परतला. परंतु सचिनने एक महिना आधीच अर्जुनसोबत इंग्लंड गाठले होते. आपल्या मुलासोबत त्याने लॉर्ड्सवरच महिनाभर सराव केला. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचल्यावरही संघाच्या सरावात अर्जुन असायचा. याचप्रमाणे आयपीएलच्या सरावातही अर्जुन हिरिरीने सहभागी होतो. सचिनचा मुलगा नसता तर अर्जुनला हे शक्य झाले असते का? त्यामुळेच सेलिब्रेटी सचिनबाबांची कहाणी जितकी खरी आणि हळवी, तितकीच तिची ही दुसरी बाजू व्यवहारकठोर आहे. या अर्जुनाला आपल्या कारकीर्दीचा अचूक लक्ष्यवेध करायचा असेल, तर तप्त निखाऱ्यांवरचाच प्रवास त्याच्यासमोर असल्यास निराळे ते काय?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 6:07 am

Web Title: story of a father
टॅग : Sachin Tendulkar
Next Stories
1 रूनी आला रे आला!
2 वयम खोटम मोठम..
3 सर्वाच्या नजरा युवराज सिंगकडे!
Just Now!
X