जवळपास १६ वर्षांपूर्वीची गोष्ट. आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी तो आणि त्याचे प्रशिक्षक गेले होते. त्यावेळी दोन प्रतिस्पर्धी विद्यार्थ्यांनी त्याच्या प्रशिक्षकांना हिणवले. ‘क्यू सर. तुम्हे राजस्थान में कोई दो हातो वाला अ‍ॅथलीट नहीं मिला? कहासें लंगडा-लुला उठाके लेके लाए.’ असे म्हटल्यावर प्रशिक्षक नि:शब्द  झाले. त्यांनी आपल्या शिष्याकडे पाहिलेदेखील नाही. त्याचा चेहरा पाहायचे त्यांना धाडसच होत नव्हते. राग तर आला होता, पण त्यांनी शब्दांनी उत्तर देणे टाळले. कारण कामगिरीने आपला शिष्य उत्तर देणार हे त्यांना माहिती होतेच. त्यानंतर शिष्याने त्यांना जबरदस्त कामगिरीने उत्तर दिले आणि चार वर्षांनी २००४ साली झालेल्या अथेन्स येथील पॅरालिम्पिकमध्ये त्याने विश्वविक्रम रचत सुवर्णपदक पटकावले. ही गोष्ट आहे ती रिओ पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या देवेंद्र झाझरिया आणि प्रशिक्षक आर. डी. सिंग यांची.

या बाबत सिंग यांना विचारल्यावर ते म्हणाले की, ‘ मी या बाबतीत त्या घटनेनंतर देवेंद्रशी संवाद साधला, पण त्याच्यासाठी हे नित्याचेच होते. भारतामध्ये असेच होणार. अपंगत्वावरून माणसं हिणवणार, याची त्याला सवयच झाली होती. त्याला आता या गोष्टींचे काही वाटत नाही. उलट त्याला या लोकांच्या अशा वागण्याने प्रेरणा मिळते.’

२००० साली देवेंद्र ग्वाल्हेरमधील अपंगांच्या लक्ष्मीबाई राष्ट्रीय विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होता. यापूर्वी त्याने शाळेमध्ये खेळामध्ये प्रावीण्य मिळवले होतेच. तेव्हापासून तो सिंग यांच्याकडे प्रशिक्षण घेत होता.

रिओला जाण्यापूर्वी सिंग आणि देवेंद्र यांच्यामध्ये तब्बल पाच तास चर्चा झाली. याबाबत सिंग म्हणाले की, ‘ अथेन्समध्ये जेव्हा देवेंद्रने सुवर्णपदक मिळवले होते तेव्हा त्याला अर्जुन पुरस्कार मिळाला आणि रिओला जाण्यापूर्वी त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गांधीनगर क्रीडा संकुलात त्याच्याशी गप्पा मारताना जुने बरेच विषय निघाले. त्यावेळी देवेंद्रकोणत्याही गोष्टीने निराश झाला नव्हता.’