संघाकडून सर्वोच्च यशाची अपेक्षा असेल, तर त्याकरिता संघात कडक अनुशासन पाहिजे. त्यामुळेच सरावात चुका करणाऱ्यांना कडक शिक्षा करणे हे माझे कर्तव्य आहे व त्या पद्धतीनेच मी संघाला मार्गदर्शन करीत आहे, असे भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनी सांगितले.

‘‘यंदाच्या वर्षांतील पहिली महत्त्वाची स्पर्धा म्हणून राष्ट्रकुल स्पर्धेकडे मी पाहत आहे. या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाठी आमच्यापुढे खडतर आव्हान आहे. हे लक्षात घेऊनच आम्ही सराव शिबिराकडे गांभीर्याने पाहिले आहे,’’ असे मरिन यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘एखादी चूकही सामन्यास कलाटणी देणारी असते. प्रत्येक खेळाडूकडून चुका होत असतात. मात्र वारंवार तशा चुका होत असतील, तर त्यावर आळा घालण्यासाठी कडक शिक्षाच योग्य असते, असे माझे प्रांजळ मत आहे. त्यामुळेच उठाबशा काढण्यापासून अनेक प्रकारच्या शिक्षा सांगत असतो, खेळाडूंनीही त्याबाबत तक्रार केलेली नाही किंवा त्याकडे नकारात्मक वृत्तीने पाहिलेले नाही. हॉकीमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा दबदबा आहे, कारण या संघात अतिशय शिस्त आहे.’’

‘‘राष्ट्रकुल स्पर्धेत विजेतेपदाच्या मार्गात ऑस्ट्रेलियाचाच अडथळा आहे. त्यांच्याविरुद्ध गोल करणे अवघड असते. यापूर्वी २०१० व २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील अंतिम सामन्यात आम्हाला त्यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यापासून आमच्या खेळाडूंनी बोध घेतला पाहिजे. ऑस्ट्रेलियावर आम्ही मातही केली आहे आणि त्यांच्याविरुद्ध जिंकण्याची आमच्याकडे क्षमता आहे, हे खेळाडूंनी विसरून चालणार नाही. अर्थात आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत आम्हाला पहिल्या लढतीत पाकिस्तानवर मात करावी लागणार आहे,’’ असे मरिन यांनी सांगितले.

‘‘राष्ट्रकुलनंतर आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे तसेच यंदाच्याच वर्षी चॅम्पियन्स चषक व विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धासाठी राष्ट्रकुल ही रंगीत तालीम आहे. या स्पर्धेत क्षमतेच्या ८० टक्के कामगिरी केली, तरी आपले पदक निश्चित आहे,’’ असेही मरिन यांनी सांगितले.