मालदिव : ऑक्टोबर महिन्यातही भारतातील करोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवणे धोकादायक ठरू शकते. त्याशिवाय बहुतांश संघ विश्वचषकातून माघार घेऊ शकतात, असा इशारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने दिला आहे.
याबरोबरच गेल्या महिन्याभरापासून भारतातील चाहत्यांना किमान सायंकाळच्या वेळेस घरात रोखून धरण्यास ‘आयपीएल’ मोलाची भूमिका बजावत होती. त्यामुळे या स्पर्धेचे उर्वरित सामने नक्कीच खेळवावे, असे मतही कमिन्सने व्यक्त केले.
‘‘आयपीएल स्थगित झाल्यामुळे ‘बीसीसीआय’ने केलेल्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मात्र ऑक्टोबरमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे उत्तम आयोजन करण्याची ‘बीसीसीआय’ला संधी आहे. परंतु ऑक्टोबरपर्यंत भारतातील परिस्थिती सुधारली नाही आणि त्यानंतरही ‘बीसीसीआय’ने विश्वचषक खेळवण्याची जोखीम पत्करली, तर विश्वचषकात सहभागी न होणेच सर्वांसाठी लाभदायक ठरेल,’’ असे कमिन्स म्हणाला.

विल्यम्सनसह न्यूझीलंडचे खेळाडू मालदिवला रवाना

नवी दिल्ली : दिल्लीत करोनाची साथ वेगाने पसरल्यामुळे हवालदील झालेला कर्णधार केन विल्यम्सनसह न्यूझीलंडचे चार खेळाडू शुक्रवारी मालदिवला रवाना झाले आहेत. विल्यम्सन, मिचेल सँटनर, कायले जॅमिसन आणि फिजिओ टॉमी सिमसेक यांनी खासगी विमानाने मालदिवकडे प्रस्थान केले. हे चौघे जण १० मेपर्यंत दिल्लीत थांबून इंग्लंडला जाणार होते.