प्रशांत केणी

राज्यातील शाळांना क्रीडा स्पर्धामध्ये विशेष ओळख मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकांपुढे सध्या चरितार्थ चालविण्यासाठी धडपड करण्याची वेळ आली आहे. शाळा आणि मैदाने ओस पडल्याने शाळांमार्फत आणि अन्य प्रशिक्षणवर्गाद्वारे मिळणारे तुटपुंजे मानधनही आता मिळेनासे झाल्याने त्यांना घर चालविण्यासाठी किराणा माल घरोघर पोहोचविण्यापासून रोजंदारीवरील कामापर्यंत वाट्टेल ते काम करावे लागत आहे.

शाळांमार्फत क्रीडा प्रशिक्षकांना तीन ते २० हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाते. त्यामुळे ते आपल्या खेळासंदर्भात मार्गदर्शनाचे वर्गही चालवतात. या दोन्ही अनिश्चित स्रोतांतून मिळणाऱ्या पैशांद्वारे त्यांचे कुटुंब चालते. परंतु शाळा आणि इतर क्रीडा स्पर्धाही टाळेबंदीच्या नियमांमुळे स्थगित आहेत. त्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे. ‘‘राज्यातील शाळांमध्ये मोठय़ा प्रमाणात कार्यरत असलेल्या क्रीडा प्रशिक्षकांवर उपासमारीची पाळी आली आहे. कारण शारीरिक शिक्षणच्या शिक्षकाप्रमाणे त्यांना वेतन मिळत नाही, तर मानधन दिले जाते,’’ असे राज्यातील शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोटकर यांनी सांगितले.

गोरेगावच्या नंदादीप विद्यालयाच्या कबड्डी संघाला मार्गदर्शन करणाऱ्या जिग्नेश मोरे यांनी सुरुवातीच्या दिवसांत परिसरातील नागरिकांसाठी भाजी आणि मासे विक्रीचा मार्ग पत्करला आहे. मोरे हे मुंबई महानगरपालिकेच्या कबड्डी उपक्रमात मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. परंतु टाळेबंदीमुळे उत्पन्नाचे हे दोन्ही मार्ग बंद झाले. सध्या ते एका वस्तूवाटप कंपनीसाठी ‘डिलेव्हरी बॉय’ म्हणून काम करीत आहेत. या परिस्थितीविषयी मोरे म्हणाले, ‘‘टाळेबंदीमुळे माझ्या रोजीरोटीचा प्रश्न बिकट होता. पत्नीला अर्धवेळ नोकरीतून जेमतेम चार हजार पगार मिळतो. त्यामुळे कुटुंबाचा भार सांभाळण्यासाठी मला काही तरी केल्याशिवाय पर्याय नाही!’’

धनंजय बर्गे काही वर्षांपूर्वी साताऱ्याहून मुंबईत नशीब अजमावण्यासाठी आले. एकीकडे शारीरिक शिक्षण शिक्षकाचा अभ्यासक्रम चालू असताना कांजूरमार्ग येथील एका शाळेत जिम्नॅस्टिक्स शिकवून २० हजार रुपये कमवायचे. परंतु टाळेबंदीमुळे हे उत्पन्न थांबल्याने धनंजय सध्या किराणा सामान वितरणाचे काम करत आहे. ‘‘मी मानखुर्दला साडेसहा हजार रुपये भाडय़ाच्या घरात पत्नीसह राहतो. साताऱ्याच्या घरी आई-वडीलांनाही पैसे पाठवावे लागतात. त्यामुळे किराणा माल वितरणाच्या कामासाठी मी सकाळी आठ वाजता घर सोडतो आणि रात्री नऊ वाजता परततो,’’ असे धनंजयने सांगितले.

यशवंत चांदजी सावंत विद्यामंदिर (भांडुप) आणि विद्यानिकेतन महाविद्यालय (घाटकोपर) यांना मार्गदर्शन करून मनीष साटम यांचा चरितार्थ चालायचा. परंतु टाळेबंदीमुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे. ‘‘सध्या टपाल खात्यातील कामासाठी ३५५ रुपये रोजंदारी मिळत आहे. ज्या दिवशी हजेरी, त्या दिवशी पगार असे कामाचे तत्त्व असल्याने रविवार किंवा सुट्टी असे काहीच नसते. पण आई-वडिलांचे आणि माझे पोट भरण्यासाठी हे करावे लागत आहे.’’

केंद्रीय विद्यालय (पवई) आणि आयईएस विद्यालय (भांडुप) अशा दोन शाळांना कबड्डीचे मार्गदर्शन करून अमित ताम्हणकर यांची गुजराण व्हायची. पण सद्य:स्थितीत पण सद्य:स्थितीत टी-शर्ट्स विक्रीचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे.