२०१९ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताचं आव्हान संपुष्टात आलं. न्यूझीलंडने भारतावर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. साखळी फेरीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या भारताची फलंदाजी उपांत्य सामन्यात अक्षरशः कोलमडली होती. भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने या सामन्याबद्दलच्या आपल्या कटू आठवणी सांगितल्या.

“माझा हा पहिला विश्वचषक होता, ज्यावेळी धोनी माघारी परतत होता त्यावेळी मी फलंदाजीसाठी मैदानात उतरत होतो. मी मोठ्या प्रयत्नाने स्वतःवर ताबा ठेवला, त्यावेळी मी फक्त रडायचा बाकी होतो. ते वातावरण माझ्यासाठी खूप निराशाजनक होतं.” नवी दिल्लीत झालेल्या India Today Mind Rocks Youth Summit कार्यक्रमात चहल बोलत होता.

साखळी फेरीत ९ सामने चांगले खेळल्यानंतर अचानक एका सामन्यात तुम्ही स्पर्धेबाहेर जाता. पावसावर नियंत्रण ठेवणं हे खेळाडूंच्या हातात नसतं. त्या दिवशी सर्व खेळाडूंना लवकरात लवकर हॉटेलवर पोहचायचं होतं, चहल उपांत्य सामन्यातील पराभवानंतर खेळाडूंच्या मनस्थितीबद्दल बोलत होता. विश्वचषकानंतर भारतीय संघाने वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळली. या दोन्ही मालिकांमध्ये चहलला विश्रांती देण्यात आली होती.