विश्वचषकात आपल्या अष्टपैलू कामगिरीने स्टुअर्ट बिन्नी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देईल असा ठाम विश्वास स्टुअर्टचे गोलंदाजी प्रशिक्षक मन्सूर अली खान यांनी व्यक्त केला आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या अंतिम १५ जणांच्या भारतीय संघातील स्टुअर्ट बिन्नीच्या समावेशावर टीका केली जात आहे. यावर बोलताना मन्सूर अली खान म्हणाले की, “ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवर खेळण्यासाठी भारतीय संघाला ज्या अष्टपैलू खेळाडूची गरज आहे असे सर्व गुण स्टुअर्ट बिन्नी मध्ये आहेत. विशेष करून न्यूझीलंडमधील खेळपट्ट्यापाहता बिन्नी भारतीय संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. स्टुअर्ट फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही भूमिकांमधून त्याच्या टीकाकारांना चोख उत्तर देईल अशा विश्वास आहे.”
विश्वचषकासाठीच्या ३० जणांच्या संभाव्य खेळाडूंमध्ये स्टुअर्ट हा एकटाच वेगवान गोलंदाजीसोबत अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू होता. त्यामुळे स्टुअर्टची अंतिम १५ जणांमध्ये निवड होणे सहाजिक आहे. स्विंग गोलंदाजी करण्यात हातखंडा असलेला स्टुअर्टमध्ये फलंदाजीचेही उत्तम कौशल्य आहे. तो संघात सहाव्या किंवा सातव्या स्थानावर फलंदाजी करु शकतो, असे स्टुअर्टचे फलंदाजी प्रशिक्षक जे.वरुण कुमार यांनी सांगितले. तसेच ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या स्टुअर्टच्या फलंदाजीच्या शैलीला मदत करणारया असल्याचेही ते पुढे म्हणाले.