News Flash

स्टुअर्ट ब्रॉडचा विक्रम; ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत केला दमदार पराक्रम

स्टुअर्ट ब्रॉडने या मालिकेत अष्टपैलू कामगिरी करत आपला ठसा उमटवला. पहिल्या कसोटी सामन्यात संघात स्थान न मिळालेल्या ब्रॉडने उर्वरित दोन सामन्यांत धडाकेबाज कामगिरी करत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं.

अखेरच्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजची दुसऱ्या डावात २ बाद १० अशी अवस्था झाली. त्याआधी इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार खेळी करत २ बाद २२६ धावांवर दुसरा डाव घोषित केला आणि वेस्ट इंडिजला विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य दिले. वेस्ट इंडिजची पहिल्या डावातही दाणादाण उडाली. १९७ धावांत त्यांचा डाव आटोपला. याच दिवसाच्या खेळात भेदक मारा करणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने नवा विक्रम केला.

इंग्लंडचा पहिला डाव ३६९ धावांवर आटोपल्यानंतर वेस्ट इंडिजचा पहिला डाव इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे १९७ धावांवर संपुष्टात आला. ६ बाद १३७ या धावसंख्येवर असणारा संघ १९७ धावांत गारद झाला. धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने ३१ धावांत ६ बळी घेतले. इंग्लंडने दुसरा डाव २ बाद २२६वर घोषित केला आणि वेस्ट इंडिजला ३९९ धावांचे आव्हान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करतानाही तिसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजने २ गडी गमावले. ते दोन गडीदेखील ब्रॉडनेच घेतले.

 

धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने नवा विक्रम केला. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ५० गडी बाद करणारा तो पहिला गोलंदाज ठरला. ११ कसोटी सामन्यात त्याने ही कामगिरी केली. या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स १० कसोटीत ४९ बळी घेत दुसरा तर फिरकीपटू नॅथन लायन ४७ बळी घेत तिसरा आहे. भारताच्या मोहम्मद शमीने ९ कसोटी सामन्यांत ३६ बळी घेत चौथे स्थान मिळवले आहे, तर न्यूझीलंडचा टीम सौदी आणि ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क हे दोघेही ६ कसोटी सामन्यात ३३ बळी घेत संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहेत.

तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ब्रॉडने दमदार अर्धशतक झळकावले. तसेच ३१ धावांत त्याने ६ बळी घेत १८व्यांदा एका डावात ५ बळी आणि १२व्यांदा एका डावात सहा बळी टिपण्याचा पराक्रम केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 1:43 pm

Web Title: stuart broad becomes the first bowler to take 50 wickets in the icc world test championship vjb 91
Next Stories
1 2008 Sydney Test : तुम्ही एकदा नाही, सातवेळा चुकलात ! भारतीय खेळाडूने बकनरला सुनावलं
2 ICCकडून वर्ल्ड सुपर लीगची घोषणा, ‘अशी’ रंगणार नवीन स्पर्धा
3 Video : “…जहाँ मुश्किलें शर्मिदा हैं”; भारतीय कुस्तीपटूचं तगडं वर्कआऊट
Just Now!
X