न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात ७ धावांनी बाजी मारत भारताने मालिकेत ५-० असा दिमाखदार विजय मिळवला. मात्र या विजयानंतर सोशल नेटवर्किंगवर चर्चा आहे ती टीम इंडियाच्या मधल्या फळीतला अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेचे. अगदी मौक्याच्या क्षणी टीम सेफर्ट आणि रॉस टेलर यांनी दुबेच्या गोलंदाजीवर एका षटकामध्ये चक्क ३४ धावा कुटल्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आता शिवम दुबेचं नाव दुसऱ्या स्थानावर आलं. यावरुन आयसीसीने एक शिवमचा फोटो पोस्ट करत एक प्रश्न क्रिकेट चाहत्यांना विचारला. मात्र या पोस्टवर चक्क इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने कमेंट केली आहे. या कमेंटला हजारोच्या संख्येने लाइक्स मिळत आहे.

नक्की काय घडलं भारत न्यूझीलंड सामन्यात?

न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सामन्याची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली. अवघ्या १७ धावांत न्यूझीलंडचे आघाडीचे ३ फलंदाज भारतीय गोलंदाजांनी माघारी पाठवले. मात्र यानंतर टीम सेफर्ट आणि रॉस टेलर यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचत सामन्याचं पारडं आपल्या बाजूने फिरवलं. या दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत, भारतीय गोटात चिंतेचं वातावरण तयार केलं. न्यूझीलंडच्या या दोन्ही फलंदाजांनी सामन्यातील दहाव्या षटकामध्ये शिवम दुबेच्या गोलंदाजीवर ३४ धावा कुटल्या. एकाच षटकात ३४ धावा देत शिवम टी-२० सामन्यांमध्ये सर्वात महागडे षटक टाकणारा भारतीय गोलंदाज ठरला.

शिवम दुबेने टाकलेल्या महागड्या षटकाचं पृथक्करण ….

पहिला चेंडू – षटकार (एकूण धावा – ६)
दुसरा चेंडू – षटकार (१२)
तिसरा चेंडू – चौकार (१६)
चौथा चेंडू – एक धाव (१७)
पाचवा चेंडू – नो-बॉलवर चौकार (२२)
पाचवा चेंडू – षटकार (२८)
सहावा चेंडू – षटकार (३४)

आणखीन कोणी किती धावा दिल्यात?

शिवम दुबे आधी २०१६ साली स्टुअर्ट बिन्नीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या समान्यात एका षटकात ३२ धावा दिल्या होत्या. त्याआधी २०१२ मध्ये सुरेश रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या समान्यात एकाच षटकात २६ धावा दिल्या होत्या. मात्र असं असलं तरी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देणाचा नकोसा विक्रम शिवम दुबेच्या नावावर झाला नाही. एका षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शिवम दुबेचं नाव दुसऱ्या स्थानावर आलं आहे. या यादीमध्ये इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आजही पहिल्याच स्थानी आहे. भारताविरुद्धच्या समान्यात ब्रॉडने एकाच षटकात ३६ धावा दिल्या होत्या.

आयसीसीची पोस्ट…

दुबेच्या षटकाचे विश्लेषण करणारी एक पोस्ट आयसीसीने आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. “शिवम दुबेने एका षटकात ३४ धावा दिल्या आहेत. एका षटकात सर्वाधिक धावा देणारा दुबे दुसरा सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. मात्र सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज कोण तुम्हाला ठाऊक आहे का?,” असा सवाल क्रिकेट चाहत्यांना विचारला आहे.

ब्रॉडची कमेंट…

इन्स्टाग्रामवरील आयसीसीच्या या पोस्टवर ब्रॉडने कमेंट केली आहे. ब्रॉडच्या एका शब्दाच्या कमेंटला ४१ हजारहून अधिक जणांनी लाइक केलं आहे. ‘सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज कोण तुम्हाला ठाऊक आहे का?,’ या आयसीसीने विचारलेल्या प्रश्नाला ब्रॉडने ‘नाही’ असं उत्तर कमेंट करुन दिलं आहे. ब्रॉडच्या या उत्तराचे स्क्रीनशॉर्ट फेसबुकवरही व्हायरल झाले आहेत.


कधी आणि कोणी कुटल्या होत्या ब्रॉडच्या गोलंदाजीवर ३६ धावा?

२००७ मध्ये टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध सामन्यात युवराजनं स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात सहा खणखणीत षटकार खेचले होते. १९ सप्टेंबर रोजी झालेल्या या सामन्यामध्ये स्टुअर्ट ब्रॉडच्या १९ व्या षटकात त्यानं लागोपाठ सहा खणखणीत षटकार खेचले होते. झालं असं की सामन्याच्या १८ व्या षटकानंतर युवराज सिंगची अँड्र्यु फ्लिंटॉफसोबत बाचाबाची झाली आणि १९ व्या षटकात याचा फटका स्टुअर्ट ब्रॉडला बसला. संतापलेल्या युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात स्टेडियमच्या चहुबाजूंना सहा उत्तुंग षटकार ठोकले. पहिल्या तीन षटकारांनंतर स्टुअर्ट ब्रॉडसह कर्णधार पौल कॉलिंगवूड देखील भांबावला. यानंतर ब्रॉडने राऊंड द विकेट गोलंदाजी टाकणे पसंत केले. पण त्याचा कोणताही फरक युवराजवर पडला नाही. एका षटकातच ३६ धावा वसूल केल्या होत्या. टी-२० कारकिर्दीतील त्याची ही विक्रमी खेळी ठरली. अवघ्या १२ चेंडूंमध्ये वेगवान अर्धशतक झळकावलं होतं. पहिल्याच चेंडूवर त्यानं मिडविकेटला उत्तुंग षटकार ठोकला. दुसरा चेंडू फ्लिक करून दुसरा षटकार खेचला. लागोपाठ दोन षटकार तडकावल्यानं ब्रॉडची लय बिघडली. त्यानं तिसरा चेंडू ऑफ साईडला टाकला. त्यावरही युवराजनं षटकार लगावला. ब्रॉडनं चौथा चेंडू हाय-फुलटॉस टाकला, पण युवराजच्या तळपणाऱ्या बॅटीतून तोही सीमापार गेला. सलग चौथा षटकार मारल्यानं ब्रॉड पार खचून गेला होता. अखेर त्यानं ओव्हर द विकेट चेंडू टाकण्याचं ठरवलं. पण मैदानावरच्या या वाघानं शेवटच्या दोन्ही चेंडूंवर षटकार मारले आणि टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सलग सहा षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

युवराजची ही खेळी पाहून फ्लिंटॉफवर तर तोंडात बोटं घालण्याची वेळ आली, तर स्टेडियमवर भारतीय चाहत्यांचा एकच जल्लोष सुरू होता. युवराजच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २० षटकात २१८ धावांचा डोंगर उभा केला. भारताने १८ धावांनी हा सामना जिंकला होता.