करोनानंतरची पहिली आंतरराष्ट्रीय मालिका इंग्लंडने जिंकली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना वेस्ट इंडिजने जिंकल्यानंतर पुढील दोन सामने इंग्लंडने जिंकले. इंग्लंडविरूद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजची दाणादाण उडाली. सामन्याच्या पाचव्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात स्टुअर्ट ब्रॉडने वेस्ट इंडिजला तीन धक्के दिले आणि कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळींचा टप्पा गाठला. त्याबद्दल स्टुअर्ट ब्रॉडचा इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने चांदीचा स्टंप देऊन सन्मान केला.

पहिल्या डावात १९७ धावांवर गारद होणाऱ्या वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावातदेखील पहिले तीन गडी झटपट गमावले होते. तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजची अवस्था २ बाद १० अशी झाली होती. त्यानंतर चौथ्या दिवशीचा खेळ पूर्णपणे वाया गेला. पण पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजने संयमी सुरूवात केली. क्रेग ब्रेथवेट बचावात्मक खेळत असतानाच ब्रॉडने त्याचा बळी टिपला आणि कसोटी क्रिकेटमधील आपला ५००वा गडी घेतला.

कसोटी क्रिकेटमध्ये पाचशे बळी टिपणारा ब्रॉड सातवा गोलंदाज ठरला. याआधी वेस्ट इंडिजचा कर्टनी वॉल्श (२००१), ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (२००४), श्रीलंकेचे मुथय्या मुरलीधरन (२००४), ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा (२००५), भारताचा अनिल कुंबळे (२००६), इंग्लंडचा जेम्स अँडरसन (२०१७) यांनी हा पराक्रम केला आहे.