आजपर्यंत ज्या खेळाडूंविषयी वृत्तपत्रात वाचले होते किंवा वाहिन्यांवर ऐकले होते अशा खेळाडूंना भेटण्याची संधी मिळाल्यामुळे शालेय विद्यार्थी भारावून गेले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने ‘शालेय शिक्षणात बुद्धिबळ’ ही योजना अमलात आणण्यास सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या स्मृतिदिनी ज्ञान प्रबोधिनीमध्ये महिला ग्रँडमास्टर सौम्या स्वामिनाथन, स्वाती घाटे, ईशा करवडे तसेच सुप्रिया जोशी या खेळाडूंनी एकाच वेळी साठ विद्यार्थ्यांबरोबर डाव खेळण्याचा उपक्रम केला. ग्रँडमास्टर अभिजित कुंटे हाही या वेळी उपस्थित होता. विद्यार्थ्यांना बुद्धिबळाविषयी ग्रँडमास्टर कुंटे, प्रा.मिलिंद नाईक यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने यापूर्वी अमानोरा प्रशाला, संस्कार गुरुकुल, दादासाहेब गुजर प्रशाला, सिम्बायोसिस, पुणे पोलिस पब्लिक स्कूल येथेही ‘शालेय शिक्षणात बुद्धिबळ’ हा उपक्रम घेतला आहे व त्यास भरघोस प्रतिसाद मिळाला होता.