शालेय कबड्डी स्पर्धा

मुंबईतील अतिवृष्टीमुळे शालेय क्रीडा स्पर्धामधील कबड्डी स्पर्धा मातीच्या मैदानाऐवजी मॅटवर खेळवण्यात आल्या; परंतु अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे शूजची वानवा तीव्रतेने जाणवली. शालेय वयातील कबड्डीपटूंसाठी मॅटवर अनवाणी खेळणे जोखमीचे असल्यामुळे कबड्डी क्षेत्रात या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

गतवर्षीपर्यंत शालेय कबड्डी स्पर्धा या मातीच्या क्रीडांगणांवर खेळवण्यात येत होत्या; परंतु यंदा पावसामुळे या स्पर्धा हॉलमधील मॅटवर खेळवण्याचा निर्णय घ्यावा लागला. परिणामी आयत्या वेळी शूजची व्यवस्था करणे सर्व शाळांना जमले नाही. परिणामी या स्पर्धेत ८० टक्के खेळाडू अनवाणी खेळल्याचे स्पष्ट होत आहे. ३० सेकंदांच्या चढाईची वेळमर्यादा दर्शवणाऱ्या बझरचा आणि गुणफलकाचा या स्पर्धेत अभाव होता.

‘‘मॅटवर खेळण्यासाठी शूज आणि नियमित सरावाची आवश्यकता असते. शालेय कबड्डीत स्पर्धेत खेळणाऱ्या सर्वच स्पर्धकांना हा सराव पुरेसा मिळत नाही. त्यामुळे मातीच्या क्रीडांगणाची आवश्यकता होती; पण आपत्कालीन परिस्थितीत मॅटवर खेळण्याचा निर्णय झाल्यानंतर त्या संदर्भात सूचना द्यायला हवी. त्यामुळे मॅटवर खेळणे बहुतांशी शाळांसाठी जोखमीचे ठरले,’’ अशी प्रतिक्रिया अँटोनिया डी’सिल्व्हा शाळेचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक तारक राऊळ यांनी व्यक्त केली.

‘‘मॅटवर शूज घालून खेळणे योग्य असते. या मॅटच्या खाली लादी असणे शालेय खेळाडूंसाठी धोकादायक आहे. त्याखाली लाकूड किंवा माती असायला हवी,’’ असे मत राज्य क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार विजेत्या राजेश पाडावे यांनी व्यक्त केले.

‘‘गेल्या वर्षी मातीच्या क्रीडांगणावर आम्ही पाच दिवसांत स्पर्धा पार पाडली. त्या वेळी पाच सामने एका वेळेस झाले होते. यंदा पावसामुळे मॅटवर एका वेळी दोन किंवा तीन सामनेच होऊ शकतात. त्यामुळे ही स्पर्धा सात दिवस चालली आहे,’’ असे मुंबई शहर कबड्डी संघटनेचे संयुक्त सचिव शरद कालंगण यांनी सांगितले.

२९२ संघांचा सहभाग

यंदाच्या शालेय कबड्डी स्पर्धेत अपेक्षेप्रमाणेच संघांच्या संख्येत वाढ झाली असून, एकूण २९२ संघांसाठी स्पर्धा घेण्याचे शिवधनुष्य मुंबई जिल्हा क्रीडा विभागाला पार पाडावे लागले. १४ वर्षांखालील गटात ७३ मुलांचे आणि ३९ मुलींचे, १७ वर्षांखालील गटात ८५ मुलांचे आणि ४१ मुलींचे तसेच १९ वर्षांखालील गटात ३४ मुलांचे आणि २० मुलींचे संघ सहभागी झाले होते.