21 September 2020

News Flash

राष्ट्रीय उपकनिष्ठ बास्केटबॉल स्पर्धा : महाराष्ट्राच्या मुलींना विजेतेपद

कर्णधार साधनाने सामन्याची सूत्रे हाती घेत भराभर गुण नोंदवण्याचा सपाटा लावला.

विजेतेपद मिळवणारा महाराष्ट्राचा मुलींचा संघ.

मुकुंद धस, कांगडा

महाराष्ट्राच्या मुलींनी गतविजेत्या तमिळनाडूचा ८३-६६ असा पराभव करून कांगडा येथे झालेल्या ४५व्या उपकनिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवलेल्या तमिळनाडूची दुसऱ्या सत्रात कोंडी करण्यात यश आल्याने महाराष्ट्राचा विजय निश्चित झाला. भूमिका सर्जे, मानसी निर्मलकर आणि अदिती पारगावकर यांनी सुंदर समन्वय राखत प्रतिस्पध्र्याच्या बचावक्षेत्रात वारंवार मुसंडी मारून बास्केट केल्याने तमिळनाडूच्या खेळाडू हतबल ठरल्या होत्या. त्यातच समीक्षा चांडक आणि तन्वी साळवे यांनी बचावात उत्कृष्ठ कामगिरी बजावून तमिळनाडूला केवळ ७ गुणांवर रोखले आणि सामन्याचा निकाल स्पष्ट झाला.

मध्यंतराच्या ४३-२७ अशा मोठय़ा आघाडीसह पुनरागमन केलेल्या शोमीराने आक्रमणाची बाजू सांभाळत संघाची आघाडी ६७-३८ अशी वाढवण्यास मदत केली. शेवटच्या सत्रात ५ फाऊल्समुळे शोमीरा, समीक्षा आणि तन्वी साळवेला मैदानाबाहेर जावे लागल्याने तमिळनाडूच्या खेळाडूत चैतन्य आले आणि त्यांनी विजेत्यांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. कर्णधार साधनाने सामन्याची सूत्रे हाती घेत भराभर गुण नोंदवण्याचा सपाटा लावला. तमिळनाडूने शेवटच्या सत्रात विजेत्यांना १६ गुणांवर रोखत २८ गुण नोंदवले. त्यात कर्णधार साधनाचा वाटा २० गुणांचा होता. आघाडी भराभर कमी होत असताना धारा फाटे आणि रिचा रवीने संयमी खेळी करत महाराष्ट्राचा विजय सुकर केला.

मुलांच्या एकतर्फी अंतिम सामन्यात बलाढय़ उत्तर प्रदेशने राजस्थानचा ७२-५६ असा पराभव करून विजेतेपदास गवसणी घातली.

संक्षिप्त गुणफलक

महाराष्ट्र : ८३ (शोमीरा बिडये २०, रिचा रवी १२, भूमिका सर्जे ११) विजयी वि. तमिळनाडू ६६ (साधना वेरोनिका ४३)

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 1:01 am

Web Title: sub junior national basketball championship maharashtra girls win title
Next Stories
1 राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : महिलांमध्ये राजमाता जिजाऊ, पुरुषांमध्ये अंकुर संघ अजिंक्य
2 IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ दिग्गज खेळाडू विराटला देतोय टिप्स?
3 IND vs AUS : स्मिथ, वॉर्नरवरील बंदी अजिबात उठवू नका – मिचेल जॉन्सन
Just Now!
X