आनंद चुलानी यांच्या मार्गदर्शनामुळे उंचावला नायरच्या यशाचा आलेख
अष्टपैलू गुणवत्ता असलेला अभिषेक नायर गेली आठ वष्रे स्थानिक क्रिकेट खेळतोय. नायरही स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा मुंबईचा सलामीवीर वासिम जाफरच्याच वाटेने वाया जाणार, असे सर्वानाच वाटत होते. यंदाच्या रणजी हंगामात नायरने ९६६ धावा काढल्या आणि १९ बळीसुद्धा मिळवले. तरीसुद्धा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यांसाठी नायरच्या नावाचा विचार झाला नाही. त्यानंतर एखाद्या जादूगाराने जादूची कांडी फिरवावी, तसे नायरचे नशीब पालटले. भारत ‘अ’ संघात नायरचा समावेश करण्यात आला. आयपीएलच्या सहाव्या पर्वासाठी झालेल्या लिलावात तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. यानंतर आता शेष भारताविरुद्धच्या इराणी सामन्यात अजित आगरकरच्या अनुपस्थितीत तो नेतृत्वाची धुरा सांभाळतो आहे. फक्त नशिबाच्या बळावर यश तुमच्याकडे येत नसते. नायरच्या या यशस्वी प्रवासात त्याला ‘गुरु’किल्ली मिळाली ती ‘अव्वल कामगिरी आणि मानसिक मनोसंधान प्रशिक्षक’ (पीक परफॉर्मन्स अ‍ॅण्ड मेंटल कंडिशनिंग कोच) आनंद चुलानी यांची.
अमेरिकेची टेनिससम्राज्ञी सेरेना विल्यम्स, ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेता नेमबाज रसेल मार्क आदी मानांकित खेळाडूंचे ‘मनोगुरू’ चुलानी हे ‘मिस्टर एनर्जी’ म्हणून ओळखले जातात. गेल्या वर्षीच्या आयपीएल हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या वाटय़ाला प्रारंभी अपयशच येत होते. परंतु चुलानी पंजाबच्या चमूत सामील झाले आणि त्यांचा विजयाचा आलेख उंचावला. गतवर्षी नायरसुद्धा पंजाबच्याच संघात होता, परंतु त्याला पुरेशी संधी मिळाली नव्हती. नायरने याच ठिकाणी चुलानी यांच्याकडून दीक्षा घेतली आणि हंगाम संपल्यानंतर प्रशिक्षणाला सुरुवात केली.
‘‘अभिषेकला जाणवत होते की, काहीतरी चुकतेय. पण नेमके काय ते त्याला उमगत नव्हते. मग मी अभिषेकसोबत चर्चा करून त्याच्या यशाचा फॉम्र्युला तयार केला. प्रत्येकासाठी यशाचा आराखडा असतो. त्याच्या मदतीने प्रत्येक जण मैदानावर आणि मैदानाबाहेर यशाचे शिखर गाठू शकतो. अभिषेकच्या खेळातील आकांक्षा आणि आवेश तुम्ही सध्या पाहू शकता,’’ असे चुलानी यांनी सांगितले.
‘‘अभिषेकने टेनिस, बॅडमिंटन खेळण्यास प्रारंभ केला, इतकेच नव्हे तर डान्स क्लासमध्येही नाव नोंदवले. या सर्व गोष्टींची त्याला फार मदत झाली. कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक व भावनिक तंदुरुस्ती या सूत्रींवर आधारित विजेता होण्यासाठी ही योजना होती,’’ असे चुलानी म्हणाले.
‘‘२०११मध्ये विश्वविजेतेपदाची किमया साधणाऱ्या भारतीय संघाला पॅडी अपटन या मानसिक मनोसंधान प्रशिक्षकाचे मार्गदर्शन लाभले होते. सध्या भारतीय संघ खडतर परिस्थितीतून जात आहे. या काळात भारतीय संघाला पुन्हा मानसिक धर्य देणाऱ्या मार्गदर्शकाची आवश्यकता आहे,’’ असे चुलानी यांनी सांगितले. ‘‘हरभजन सिंग, एस. श्रीशांत यांसारख्या अनेक खेळाडूंमध्ये प्रचंड ऊर्जा आहे, पण क्षणार्धात क्रोधित होणाऱ्या या खेळाडूंना योग्य मानसिक मार्गदर्शन लाभले तर ते अधिक यशस्वी होतील,’’ असे ते पुढे म्हणाले.