२०२०च्या ‘आयसीसी’ युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी प्रियम गर्गकडे भारताचे नेतृत्व

पुढील वर्षी होणाऱ्या ‘आयसीसी’ युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी (१९ वर्षांखालील) मुंबईतील यशस्वी जैस्वाल, अथर्व अंकोलेकर आणि दिव्यांश सक्सेना या तीन खेळाडूंचा भारताच्या संघात समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका येथे पुढील वर्षी १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान खेळण्यात येणाऱ्या या स्पर्धेसाठी सोमवारी १५ खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर करताना प्रियम गर्गकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीने रविवारी झालेल्या बैठकीत भारतीय संघाची निवड केली. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या या संघाने गतवर्षी मुंबईकर पृथ्वी शॉच्या नेतृत्वात चौथ्यांदा विश्वचषक उंचावला होता.

मुंबईचा १७ वर्षीय डावखुरा सलामीवीर यशस्वीने ऑक्टोबरमध्ये झालेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी वयात द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. त्याचप्रमाणे २०१८च्या युवा आशिया चषकात त्याने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावण्याची किमया साधली होती.

१८ वर्षीय डावखुरा फिरकीपटू अथर्वने सप्टेंबरमध्ये झालेल्या युवा आशिया चषकात भारताला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती तर, दिव्यांशने नुकत्याच अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

एकूण १६ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत प्रत्येकी चार संघांचा एक गट बनवण्यात आला असून गतविजेता भारत, जपान, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे. १९ जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याने भारत विश्वचषक अभियानाची सुरुवात करणार आहे.

त्याशिवाय विश्वचषकापूर्वी भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार असून त्यानंतर भारत, आफ्रिका, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे या संघांमध्ये चौरंगी मालिकाही खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी विश्वचषकातील १५ खेळाडूंव्यतिरिक्त फक्त सीटीएल लक्ष्मण या एकमेव अतिरिक्त खेळाडूला संघात स्थान दिले आहे.

विश्वचषकासाठी संघ

प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुवचंद जुरेल (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, अथर्व अंकोलेकर, दिव्यांश सक्सेना, तिलक वर्मा, शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभंग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक), सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील.

दक्षिण आफ्रिका आणि  चौरंगी मालिकेसाठी संघ

प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुवचंद जुरेल (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, अथर्व अंकोलेकर, दिव्यांश सक्सेना, तिलक वर्मा, शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभंग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक), सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील, सीटीएल रक्षण.

आशिया चषकातील कामगिरी माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. विश्वचषकाच्या संघात निवड झाल्याचे आईला कळवताच तिलाही फार आनंद झाला. तिच्या पाठिंब्यामुळेच मी इथवर मजल मारली असून विश्वचषकातही छाप पाडण्यासाठी मी उत्सुक आहे.

– अथर्व अंकोलेकर, भारतीय युवा खेळाडू