गेल्या सहा ते सात महिन्यांपासून भारतीय संघापासून दूर राहिल्यामुळे यादरम्यानच्या काळात गोलंदाजीतील त्रुटींवर अधिक लक्ष देऊन त्यामध्ये सुधारणा करता आली, अशी प्रतिक्रिया भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने मंगळवारी व्यक्त केली.

३१ वर्षीय उमेशने वेस्ट इंडिज अध्यक्षीय एकादश संघाविरुद्धच्या सराव सामन्यात तीन बळी मिळवले. २०१८मध्ये उमेश भारताकडून अखेरचा कसोटी सामना खेळला आहे. तर एकदिवसीय व ट्वेन्टी-२० संघात त्याला क्वचितच सहभागी केले जाते. त्यामुळे यादरम्यानच्या काळात उमेशने विदर्भ क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक सुब्रतो बॅनर्जी यांचे मार्गदर्शन घेतले.

‘‘वेगवान गोलंदाज म्हणून तुम्हाला नेहमीच चेंडूची दिशा आणि टप्पा यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. गेल्या काही महिन्यांपासून माझ्या गोलंदाजीची लय बिघडली होती. त्यामुळेच मी बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजीतील त्रुटी सुधारण्यावर भर दिला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत तुम्हाला नक्कीच माझ्या गोलंदाजीत सुधारणा झालेली दिसेल,’’ असे उमेश म्हणाला.

‘‘विंडीजविरुद्धच्या सराव सामन्यात मी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्यात मी भर दिला. बऱ्याच काळानंतर सराव सामना खेळत असल्याने माझ्याकडून चांगली गोलंदाजी झाली. येथील खेळपट्टीवर चेंडूला स्विंग नव्हता. त्यामुळे चेंडूला अचूक टप्पा आणि दिशा देण्यावरच मी अधिक लक्षकेंद्रीत केले आहे,’’ असेही रणजी स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेशने सांगितले.