सॅपपोरो : जुलै महिन्यात होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्स प्रकारातील शर्यतींचे योग्य प्रकारे आयोजन करता येईल, असा विश्वास जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे प्रमुख सबास्टिअन को यांनी व्यक्त केला.

जपानमधील सॅपपोरो येथे बुधवारी अर्ध-मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन केल्यानंतर आता लवकरच पूर्ण मॅरेथॉन आणि अन्य शर्यतींच्या आयोजनासाठीही जागतिक संघटना प्रयत्नशील आहे. यामुळे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्सच्या स्पर्धामध्ये कोणते अडथळे येऊ शकतात, यांचा अंदाज येईल आणि त्यावर उपाय शोधून मुख्य ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्सच्या स्पर्धा कोणत्याही अडचणींशिवाय संपन्न होतील, अशी माहिती को यांनी दिली. येत्या रविवारी आणखी एक चाचणी स्पर्धा रंगणार असून को स्वत: त्या स्पर्धेची पाहणी करून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे अहवाल सुपूर्द करणार आहेत.

‘‘जपानमधील फक्त दोन टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ऑलिम्पिकपूर्वी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अ‍ॅथलिट्सचे लसीकरण व्हावे, अशी आमची इच्छा आहे. येथील सद्य:स्थितीची आम्हाला जाणीव आहे. मात्र ऑलिम्पिकमुळे जपानसह संपूर्ण विश्वात नवचैतन्य संचारेल,’’ असेही को यांनी सांगितले.