विख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाच्या मेंदूतील गुठळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. मॅराडोनाचा नुकताच ६०वा वाढदिवस साजरा झाला होता.

‘‘मॅराडोनावर झालेली शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. मॅराडोनाला सोमवारी अपचनाचा त्रास आणि अशक्तपणा वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळेला तपासणीत त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे दिसले होते. मात्र मॅराडोनाची प्रकृती चांगली आहे,’’ असे या महान फुटबॉलपटूच्या व्यवस्थापकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अर्जेटिनाला १९८६मध्ये फुटबॉल विश्वचषक जिंकून देणाऱ्या मॅराडोनासोबत रुग्णालयात त्याचे कुटुंबीय उपस्थित होते.

अर्जेटिनातील ला प्लाटा येथे गेल्या वर्षीपासून मॅराडोनाचे वास्तव्य आहे. तेथील जिम्नॅशिया एसग्रिमो संघाचा प्रशिक्षक म्हणून गेल्यावर्षीपासून त्याची नियुक्ती झाली आहे.