07 December 2019

News Flash

वाडेकर यांना विश्वविजेतेपद समर्पित!

भारताच्या अपंग क्रिकेट संघाचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांची प्रतिक्रिया

भारताच्या अपंग क्रिकेट संघाचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांची प्रतिक्रिया

मुंबई : अपंगांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताला मिळालेले विजेतेपद हे भारतीय संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांना समर्पित करतो. अपंगांच्या क्रिकेटला योग्य न्याय मिळण्यासाठी त्यांनी सलग ३० वर्षे प्रयत्न केले, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

अपंगांसाठी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा व्हावी, हे वाडेकर यांचे स्वप्न होते. गतवर्षी १५ ऑगस्टला त्यांचे निधन झाले. परंतु अनिल जोगळेकर यांनी त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण केले. भारतीय संघाचा हा सुवर्णदिन पाहण्यासाठी ते आमच्यासोबत असायला हवे होते, अशी खंत कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

भारतीय संघाच्या कामगिरीचे विश्लेषण करताना कुलकर्णी म्हणाले, ‘‘भारताचे यश हे अभूतपूर्व आहे. इंग्लंड संघातील खेळाडूंच्या अपंगत्वाचे प्रमाण हे १८ टक्के होते, तर भारतीय खेळाडूंचे ४० टक्के होते. इंग्लंडच्या खेळाडूंची तंदुरुस्ती ही लक्षणीय होती. परंतु भारतीय खेळाडूंनी गुणवत्तेच्या बळावर त्यांच्यावर मात केली. फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर आम्ही सरस ठरलो.’’

अंतिम सामन्यासाठी आखलेल्या रणनीतीबाबत कुलकर्णी म्हणाले, ‘‘इंग्लंडला उपांत्य सामना खेळल्यानंतर तासाभरात अंतिम सामना खेळावा लागला. उपांत्य सामन्याच्या उत्तरार्धात त्यांचे क्षेत्ररक्षण होते. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यावर आम्ही प्रथम फलंदाजी स्वीकारली. जेणेकरून इंग्लंडच्या संघाला सलग ४० षटके क्षेत्ररक्षण करावे लागले. शिवाय आमच्या फलंदाजांनी एकेरी-दुहेरी धावा काढण्यावर भर दिला, त्यामुळे त्यांची अधिक दमछाक झाली. ’’

भारतीय संघाच्या योग्य तयारीचेच हे फलित असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. ‘‘खेळाडूंची निवड प्रक्रिया आणि स्पर्धेआधीचे विशेष सराव सत्र योग्य पद्धतीने झाले. सहा दिवस अगोदरच वातावरणाशी जुळवून घेण्याच्या इराद्याने आम्ही इंग्लंडला पोहोचलो. त्यामुळे विश्वचषकापूर्वी काही सामन्यांचा सरावसुद्धा करता आला, हा सराव महत्त्वाचा ठरला’’ असे कुलकर्णी यांनी सांगितले.

First Published on August 15, 2019 5:26 am

Web Title: sulakshan kulkarni reaction on winning physical disability world series t20 zws 70
Just Now!
X