15 August 2020

News Flash

भारत चारी मुंडय़ा चीत

ऑस्ट्रेलियाची नवव्यांदा विजेतेपदाला गवसणी

| April 17, 2016 03:14 am

ऑस्ट्रेलियन आक्रमणपटूकडून चेंडूचा ताबा मिळवण्यासाठी झगडताना भारतीय खेळाडू.

ऑस्ट्रेलियाची नवव्यांदा विजेतेपदाला गवसणी

विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारतीय हॉकीपटू नेहमीच दडपणाखाली खेळतात, हाच प्रत्यय अझलन शाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुन्हा आला. भारताला चारीमुंडय़ा चीत करून ऑस्ट्रेलियाने नवव्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले.

या स्पर्धेतील साखळी गटात ऑस्ट्रेलियाने भारताला ५-१ असे हरवले होते. अंतिम फेरीत त्यांनी ४-० अशा फरकाने भारताला पराभूत केले. थॉमस क्रेग व मॅट गोहडेस यांनी प्रत्येकी दोन गोल करीत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. पूर्वार्धात त्यांनी १-० अशी आघाडी मिळवली होती.

भारताने मलेशियाविरुद्ध ६-१ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे अंतिम फेरीत ते कांगारूंना चिवट लढत देतील अशी अपेक्षा होती. पूर्वार्धात भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या अनेक चाली रोखल्या होत्या. त्यामुळेच की काय ऑस्ट्रेलियाला खाते उघडण्यासाठी २९ मिनिटे वाट पाहावी लागली. थॉमसने जोरदार चाल करीत हा गोल केला. पूर्वार्धात ऑस्ट्रेलियाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही.

सामन्याच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धारदार आक्रमण केले. बराच वेळ भारताच्याच डी-सर्कलजवळ ते खेळत होते. सामन्याच्या ३५व्या मिनिटाला थॉमसने स्वत:चा व संघाचा दुसरा गोल केला. त्यानंतर भारताने धारदार आक्रमण करीत पेनल्टी कॉर्नरची संधीही मिळविली, मात्र त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. दुसऱ्या बाजूने ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सातत्याने चाली करीत भारतीय खेळाडूंवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. ४३व्या मिनिटाला त्यांच्या मॅटने अप्रतिम गोल करीत संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. हा गोल झाल्यानंतर भारताच्या मनदीपसिंग याने गोल करण्याची चांगली संधी वाया घालविली. सामन्याच्या ५७व्या मिनिटाला पुन्हा मॅटने रिव्हर्स फ्लिकचा उपयोग करीत भारताच्या गोलरक्षकाला निमिषार्धात चकवले व संघाची बाजू ४-० अशी भक्कम केली. त्यानंतर त्यांच्या चाली रोखण्यात भारतीय खेळाडूंना यश मिळाले.

भारतीय खेळाडूंना या सामन्यात अगदी मोजक्याच संधी मिळाल्या. मात्र खेळाडूंमधील समन्वयाच्या अभावामुळे त्यांना या संधीचा लाभ घेता आला नाही. पासिंगच्या कौशल्याबाबतही भारतीय खेळाडूंचा कमकुवतपणा पुन्हा येथे दिसून आला. भारतीय खेळाडूंनी पेनल्टी कॉर्नरच्या दोन संधी वाया घालवल्या. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी २०१४ मध्ये विजेतेपद मिळवले होते. गतवर्षी त्यांना न्यूझीलंडने पराभूत करीत अजिंक्यपदावर मोहर उमटवली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2016 3:14 am

Web Title: sultan azlan shah cup 2016 final as it happened
टॅग India Vs Australia
Next Stories
1 भारताच्या कनिष्ठ टेनिस संघाची जागतिक गटात धडक
2 कोल्हापूरच्या संदीप सावंतकडे महाराष्ट्राच्या हॉकी संघाचे नेतृत्व
3 ग्लेन मॅक्सवेलला सक्त ताकीद
Just Now!
X