पीटीआय, इपोह (मलेशिया)

मागील वर्षीचे नैराश्य झटकून हॉकीमधील सुवर्णकाळ परतण्याच्या ईष्र्येने भारतीय संघ सुल्तान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत शनिवारी आशियाई सुवर्णपदक विजेत्या जपानशी सलामीला भिडणार आहे.

दुखापतींमुळे अनेक खेळाडूंशिवाय उतरणाऱ्या भारतीय संघाला प्रशिक्षकाची उणीवसुद्धा तीव्रतेने भासते आहे. सराव सामन्यात गरुजत सिंगच्या नाकाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मायदेशात परतावे लागले आहे. या पाश्र्वभूमीवर कामगिरी उंचावण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल.

‘‘अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंनी आपली कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूंना नव्या खेळाडूंच्या खेळाविषयी कमी माहिती असल्यामुळे ते पथ्यावर पडू शकते,’’ असे भारताचा कर्णधार मनप्रीत सिंगने सांगितले.

भारतीय संघ सोमवारी मलेशियात दाखल झाला आणि मंगळवारी यजमानांविरुद्धच्या सराव सामन्यात अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. मागील अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारताला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी ऑलिम्पिक विजेत्या अर्जेटिनाने भारतावर ३-२ असा निसटता विजय मिळवला होता. इंग्लंडविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता. विजेत्या ऑस्ट्रेलियाने ४-२ आणि मलेशियाने ५-१ अशी भारतावर मात केली होती. साखळीत आर्यलडकडून ३-२ असा पराभव पत्करणाऱ्या भारताने मग पाचव्या स्थानासाठीच्या लढतीत त्यांना ४-१ असे नामोहरम केले होते.

* सामन्याची वेळ : दु. १.३५ वा.

 

हॉकी स्पर्धेतील भारताची कामगिरी

विजेतेपद : १९८५, १९९१, १९९५, २००९

संयुक्त विजेतेपद : २०१०

उपविजेतेपद : २००८, २०१६

तिसरे स्थान : १९८३, २०००, २००६, २००७, २०१२, २०१५, २०१७

जपान, कोरिया आणि यजमान मलेशिया या संघांचे भारतासमोर प्रमुख आव्हान असेल. ते पूर्ण ताकदीनिशी उतरत असल्यामुळे त्यांचा सामना करताना आमचा कस लागेल.

-मनप्रीत सिंग, भारताचा कर्णधार