अझलन शहा हॉकी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात अर्जेंटीनाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात भारताने विजयाच्या संधीवर पाणी फिरवलं. अखेरच्या सत्रापर्यंत १-० अशा आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला अखेरच्या काही मिनीटांत इंग्लंडच्या खेळाडूंवर अंकुश ठेवणं जमलं नाही. याचा फायदा घेत पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत इंग्लंडने सामन्यात बरोबरी साधली. पहिल्या सामन्याच्या तुलनेत इंग्लंडविरुद्ध भारताने आश्वासक खेळ केला असला तरीही या सामन्यात भारताने तब्बल ९ पेनल्टी कॉर्नर वाया घालवले. या ९ पैकी एकाही संधीचं गोलमध्ये रुपांतर झाल्यास या सामन्याचा निकाल भारतीय संघाच्या बाजूने लागू शकला असता.

पहिल्या सामन्याप्रमाणे इंग्लंडविरुद्ध सामन्यातही भारताच्या युवा खेळाडूंनी आश्वासक खेळ केला. रमणदीप सिंह, तलविंदर सिंह, सुमीत कुमार या खेळाडूंनी पहिल्या सत्रात इंग्लंडच्या खेळाडूंवर वर्चस्व गाजवलं. भारताच्या आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंनी एकामागोमाग एक आक्रमक चाली रचत इंग्लंडवर दबाव टाकायला सुरुवात केली. अखेर पहिल्या सत्राच्या अखेरीस रमणदीप सिंह आणि तलविंदर यांनी रचलेल्या चालीवर नवोदीत खेळाडू शिलानंद लाक्राने चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलत भारताला सामन्यात आघाडी मिळवून दिली.

पेनल्टी कॉर्नवर मिळालेल्या संधींचं गोलमध्ये रुपांतर न होणं हे भारत आज सामना जिंकू न शकण्यामागचं महत्वाचं कारण ठरलं आहे. रुपिंदरपाल सिंह आणि हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाचं ड्रॅगफ्लिकींग सेक्शन कमकुवत पडलं आहे. मध्यांतरापर्यंत भारताला तब्बल ८ पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र एकाही संधीचं गोलमध्ये रुपांतर करण्यात भारतीय खेळाडू अपयशी ठरले.

अवश्य वाचा – अझलन शहा हॉकी २०१८ – सलामीच्या सामन्यात भारत पराभूत, अर्जेंटीनाच्या गोंझालो पेयाटची हॅटट्रीक

यानंतर तिसऱ्या सत्रात इंग्लंडच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मात्र भारताच्या बचावफळीने भक्कम बचाव करत इंग्लंडच्या खेळाडूंचे मनसुबे हाणून पाडले. भारतीय खेळाडूंची सामन्यावरील पकड पाहता २७ व्या सुलतान अझलन शहा चषक हॉकी स्पर्धेत भारत आपला पहिला विजय मिळवणार असं वाटत असताना, शेवटच्या पाच मिनीटांत पंचांनी इंग्लंडला पेनल्टी स्ट्रोकचा फटका बहाल केला. याचा फायदा घेत इंग्लंडच्या मार्क ग्लेघोरीनने गोल करत सामन्यात इंग्लंडला बरोबरी साधून दिली.