२७ व्या सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने पुन्हा एकदा निराशाजनक खेळाचं प्रदर्शन केलं आहे. आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात भारताला आयर्लंडकडून पराभव स्विकारावा लागला. मलेशियावर ५-१ ने मात केल्यानंतर अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला आयर्लंडवर मोठ्या फरकाने मात करणं गरजेचं होतं. मात्र प्रत्यक्ष सामन्यात आयर्लंडच्या संघाने जोरदार पुनरागमन करत भारताला ३-२ अशा फरकाने पराभूत केलं. या पराभवासह भारताच्या या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहचण्याच्या आशा संपुष्टात आल्याचं दिसतंय.

मलेशियावर मोठ्या फरकाने मिळवलेल्या विजयानंतर भारतीय संघासाठी अंतिम फेरीत प्रवेशाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताने पुन्हा एकदा निराशाजनक खेळ केला. सामन्याच सुरुवातीच्या सत्रांमध्ये भारतीय संघाने सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली होती. रमणदीप सिंहने १० व्या तर अमित रोहिदासने २६ व्या मिनीटाला गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली होती.

मात्र मध्यांतराच्या खेळानंतर आयर्लंडने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेतली. वन-टच पास आणि २५ यार्ड सर्कलमध्ये आक्रमक चाली रचत आयरिश खेळाडूंनी भारतीय बचावफळीवर दडपण टाकायला सुरुवात केली. आयर्लंडने लावलेल्या या जाळ्यात भारताची बचावफळी बरोबर अडकली. अखेरच्या सत्रात गोलकिपर सुरज करकेराला गोलपोस्टजवळ एकट सोडण्यासारख्या गंभीर चुका भारतीय बचावपटूंनी केल्या. याचसोबत एकही भारतीय खेळाडूचे पास हे योग्य दिशेने जात नव्हते. आयर्लंडच्या आक्रमक खेळामुळे दडपणाखाली आलेला भारतीय संघ यातून सावरुच शकला नाही. ज्याचा फायदा घेत आयर्लंडने भारतावर मात करुन स्पर्धेतला आपला पहिला विजय संपादन केला.