भारतीय युवा हॉकी संघाचं सुलतान जोहर चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचं स्वप्न आज भंगलं आहे. ऑस्ट्रेलियापाठोपाठ इंग्लंडने भारतावर २-१ अशी मात केली. या पराभवामुळे भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आलेला नाहीये. या पराभवामुळे भारतीय संघ उद्या कांस्यपदकासाठी मलेशियाविरुद्ध खेळणार आहे. सामन्यात इंग्लंडच्या टॉम सोर्सबायने पहिला गोल करत इंग्लंडला आघाडी दिली. मात्र रोशन कुमारने २५ व्या मिनीटाला भारताला बरोबरी साधून दिली. यानंतर हा सामना बरोबरीत सुटेल असं वाटत असतानाच जॅक वॉलरने ५२ व्या मिनीटाला गोल करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारताला साखळी फेरीच्या अंतिम सामन्यात विजय मिळवणं आवश्यक होतं. या सामन्यात इंग्लंडच्या तुलनेत भारतीय खेळाडूंनी जास्त काळ आक्रमण केलेलं पहायला मिळालं. मात्र इंग्लंडचा गोलकिपर ख्रिस वेवरने प्रताप लाक्राचा फटका अडकवत भारतीयांचे प्रयत्न हाणून पाडले.

अवश्य वाचा – Women’s Asia Cup Hockey – भारतीय महिलांचं चक दे इंडिया, सिंगापूरचा १०-० ने धुव्वा !

यानंतर तिसऱ्या सत्रात इंग्लंडच्या संघाने आक्रमक खेळ करायला सुरुवात केली. तिसऱ्या सत्रात इंग्लंडला ३ पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र भारतीय संघाने उत्तम बचाव करत इंग्लंडला गोल करण्याची संधी दिली नाही. चौथ्या सत्रात इंग्लंडने घेतलेली आघाडी मोडून बरोबरी साधण्याचा भारतीय संघाने जोरदार प्रयत्न केला, मात्र इंग्लंडच्या भक्कम बचावासमोर त्यांची डाळ शिजू शकली नाही.