कर्णधार मनदीप मोरने ४२ व्या मिनीटाला पेनल्टी कॉर्नरवर केलेल्या गोलच्या जोरावर भारताने सुलतान जोहर चषकात जपानवर १-० ने मात केली. या स्पर्धेतला भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला आहे. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे काही काळासाठी सामना थांबवण्यात आला होता. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

या सामन्यात जपानने भारताला चांगलीच टक्कर दिली, भारताच्या सर्व आक्रमक चाली जपानी बचावफळीने हाणून पाडल्या. पहिल्या सत्रात भारताला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या संधी आल्या होत्या, मात्र जपानने यावेळीही जोरदार बचाव करत भारताच्या मनसुब्यांवर पाणी फिरवलं. मध्यांतरापर्यंत सामना ०-० असा बरोबरीत असल्यामुळे नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागणार याची सर्वांना उत्सुकता होती.

तिसऱ्या सत्रात भारतीय संघाला लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, ज्यामध्ये दुसऱ्या संधीवर कर्णधार प्रदीप मोरने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपायला अवघी काही सेकंद शिल्लक असताना जपानला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी चालून आली होती, मात्र भारताने यावेळी भक्कम बचाव करत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. आतापर्यंत भारताने मलेशियाला २-१, न्यूझीलंडला ७-१ अशी मात दिली आहे.